स्पर्श प्रणालीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान रखडले

12 Mar 2026 16:39:30
समुद्रपूर,
Awas Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ संकल्पनेतून गरीबांना हकाचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली असून या योजनेच्या माध्यमातून गरजू, गरीबांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेल्या स्पर्श प्रणालीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे अनेकांचे बांधकाम थांबले असून अनुदानाची रकम तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे.
 
 
 
Pradhan Mantri Awas Yojana subsidy delay,
अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर झाले. या योजनेच्या माध्यमातून घराच्या बांधकामासाठी फत १ लाख २० हजार रुपये टप्प्याटप्प्याने वितरित केले जाते. या महागाईच्या काळात घराला बांधकामासाठी लागणार्‍या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. यामुळे या पैशात घराचा साधा पायवा सुद्धा होत नाही. तरीदेखील अनेक गरीबांनी पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही, या भीतीपोटी हिंमत करून घराच्या बांधकामाला सुरूवात केली आहे. सुरूवातीला या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर जमा होत होते. मात्र, मागील दोन महिन्यापासून केंद्र सरकारच्या स्पर्श प्रणालीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कर्ज काढून उधारीवर साहित्य घेऊन घराचे काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांमंध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे लक्ष देऊन तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रकम जमा करावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, जिल्हा सचिव सचिन गावंडे, राजेश सावरकर, जगदीश संचारीया, दामिना डेकाटे, सुजाता ताकसांडे, किशोर नेवल, संजय ढोवणे, अनंता हटवार, विनोद वानखेडे, सतीश ठाकरे, राजू नौकरकर, मुर्लीधर चौधरी, जगदीश वरटकर, वर्षा गणवीर, चित्रा पुजदेकर, मंजुषा माहुरे, नलिनी थुटे, शारदा तुमराम, आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0