‘धुरंधर २’च्या प्रदर्शनापूर्वीच धडाकेबाज कमाई

परदेशातही अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Dhurandhar 2 बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर २’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजून काही दिवस बाकी असतानाच त्याने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून उल्लेखनीय कमाई केली असून परदेशातही चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा दबदबा निर्माण केल्याचे मानले जात आहे.
 

Ranveer Singh Dhurandhar 2 
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट असून १९ मार्च रोजी हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. जियो स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओज यांच्या सहकार्याने तयार झालेल्या या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने आधीच विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. उत्तर अमेरिकेत पहिल्या आठवड्याच्या शेवटासाठी चित्रपटाच्या तिकिटांना मोठी मागणी दिसून आली असून सुमारे २८ लाख डॉलरची कमाई झाली आहे. प्रीमियर अ‍ॅडव्हान्स सेलमध्येच ६७१ ठिकाणी १,५८९ शोसाठी विकल्या गेलेल्या तिकिटांमधून सुमारे ८.०४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.कॅनडामध्येही ‘धुरंधर २’ने उल्लेखनीय कामगिरी करत रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा विक्रम मोडल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी कॅनडामध्ये सुमारे ४० हजार तिकिटांची विक्री झाली असून त्यातून जवळपास चार कोटी रुपयांची कमाई झाल्याचे सांगितले जात आहे. बॉक्स ऑफिस विश्लेषक जितिंदर सिंग यांच्या मते, लवकरच कॅनडामध्ये या चित्रपटाच्या तिकिटांची विक्री एक लाखांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात ७ Dhurandhar 2 मार्चपासून ‘धुरंधर २’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली असून निर्मात्यांनी १८ मार्च रोजी पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्याची घोषणा केली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात सुमारे ४ लाख १० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.प्री-सेल्समधून चित्रपटाने ब्लॉक केलेल्या सीट्सशिवाय सुमारे २१.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर ब्लॉक सीट्ससह ही कमाई २६.५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हिंदी आवृत्तीसाठी सर्वाधिक म्हणजे ३ लाख ८१ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. याशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.या सर्व आकडेवारीवरून ‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रणवीर सिंगच्या चाहत्यांसह चित्रपटप्रेमींमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून प्रदर्शनानंतर हा चित्रपट कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.