मानसिक तणावाची सावली

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
वेध...
 
नंदकिशोर काथवटे
mental stress एका आत्महत्येने उभे केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न मनाला चटका लावून गेले. या प्रश्नांवर नक्कीच गांभीर्याने चिंतन करण्याची गरज आहे. नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी केलेल्या आत्महत्येने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण समाज हादरून गेला आहे. समाजात प्रतिष्ठा, चांगले शिक्षण, स्थिर कुटुंब आणि यशस्वी करीअर असलेली व्यक्ती अचानक असा टोकाचा निर्णय घेते, तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही तर अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. विशेष म्हणजे त्यांचे पती स्वतः मनोविकार तज्ज्ञ असल्यामुळे ही घटना अधिकच अस्वस्थ करणारी ठरते. मानसिक आरोग्याबद्दल समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या कुटुंबातच अशी घटना घडते, हे वास्तव आपल्या काळातील तणावाच्या गंभीरतेची जाणीव करून देते. आजच्या काळात मानसिक तणाव हा एक न बोलला जाणारा, पण प्रत्येकाच्या आयुष्यात हळूहळू वाढत चाललेला संकट बनत आहे. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असले, तरी प्रत्येक माणूस आतून अनेक संघर्ष झेलत असतो. नोकरीची असुरक्षितता, वाढती स्पर्धा, आर्थिक दबाव, सामाजिक अपेक्षा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा भार अनेकांना शांतपणे सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत मनात साचत जाणारा ताण कधी कधी असह्य होतो आणि माणूस टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे आयुष्य बाहेरून खूप स्थिर आणि प्रतिष्ठित वाटत असले, तरी वास्तव वेगळे असते. डॉक्टरांवर असलेली जबाबदारी, रुग्णांच्या अपेक्षा, सततचे कामाचे तास आणि समाजाकडून असलेला दबाव यामुळे त्यांच्यावरही मोठा मानसिक ताण असतो. अनेकदा डॉक्टर स्वतःच्या भावनांकडे आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
 
 

mental stress
 
 
कारण समाजाच्या नजरेत डॉक्टर म्हणजे नेहमी मजबूत, संयमी आणि समस्यांचे उत्तर देणारी व्यक्ती असते. पण शेवटी तेही माणूसच असतात. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासानंतरच वास्तव समोर येईल. परंतु या घटनेने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे- मानसिक तणाव हा कोणत्याही स्तरावरच्या व्यक्तीला ग्रासू शकतो. पैसा, प्रतिष्ठा किंवा शिक्षण यापैकी कोणतीही गोष्ट मानसिक वेदना पूर्णपणे दूर करू शकत नाही. समाजात मानसिक आरोग्याबद्दल अजूनही खुली चर्चा होत नाही. अनेक लोक आपल्या समस्या मनातच दाबून ठेवतात. लोक काय म्हणतील? या भीतीमुळे मदत मागण्याचे धाडस अनेकांना होत नाही. परिणामी तणाव, नैराश्य आणि एकाकीपणा वाढत जातो. अशा वेळी कुटुंब, मित्र आणि समाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला, एकटेपणा वाढला किंवा निराशेची चिन्हे दिसू लागली तर त्याकडे दुर्लक्ष न करता संवाद साधणे गरजेचे आहे. आज आणखी एक चिंताजनक वास्तव समोर येत आहे. आत्महत्यांच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. शिक्षणातील वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, करीअरची अनिश्चितता आणि सोशल मीडियामुळे निर्माण होणारा दबाव यामुळे अनेक तरुण मानसिक तणावाखाली जगत आहेत. आयुष्याची सुरुवातच संघर्षाने भरलेली वाटू लागली, तर काही जण निराशेच्या अंधारात हरवून जातात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी समाजाला गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्येही आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची बाब तितकीच वेदनादायक आहे. समाजाने पुरुषांना नेहमी मजबूत, कठोर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारी भूमिका दिली आहे. त्यामुळे अनेक पुरुष आपल्या वेदना, अपयश किंवा मानसिक तणाव व्यक्त करू शकत नाहीत. घराची जबाबदारी, आर्थिक ताण आणि समाजाच्या अपेक्षा यांच्या ओझ्याखाली अनेक पुरुष शांतपणे तुटत जातात. पण त्यांच्या वेदनांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या निधनाने एक दुःखद शोकांतिका घडली आहे; त्याच वेळी समाजाला एक मोठा धडादेखील मिळतो आहे.mental stress मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय संकल्पना नाही, तर ती सामाजिक जबाबदारी आहे. घराघरात संवाद वाढविणे, भावनांना मोकळेपणाने व्यक्त करण्याची सवय लावणे आणि मानसिक समस्यांकडे लाज किंवा दुर्बलतेच्या नजरेने न पाहणे ही काळाची गरज आहे. कदाचित डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येमागील सत्य पुढे येईल. पण त्या निमित्ताने समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे- आपण खरोखर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत का? कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज नसते, फक्त कोणीतरी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकणारा असणे पुरेसे असते. आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जीवनात मानसिक आरोग्य हा विषय दुर्लक्षित ठेवणे आता शक्य नाही. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक संस्थेत या विषयावर संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा आपल्याला अस्वस्थ करत राहतील.
9922999588