नियमबाह्य प्रभार दिल्याचे स्पष्ट
प्रभार देण्यासाठी राजकीय शिफारस
अमरावती,
अमरावती पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (शिक्षण) Sudhir Khode सुधीर खोडे यांना अंजनगाव सुर्जी येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा नियमबाह्य प्रभार देण्यामागचे गुपीत दहावीच्या उत्तरपत्रिका चोरी प्रकरणानंतर उलगडत आहे. मुख्य आरोपी म्हणून अटक झालेल्या खोडे यांना प्रभार देण्यासाठी खासदार व आमदाराची शिफारस तर होतीच, शिवाय त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहिल्याचेही समोर आले आहे.
Sudhir Khode अमरावती ते अंजनगाव सुर्जी हे अंतर ८० किलोमीटरहून अधिक आहे. प्रशासकीय नियमानुसार गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार हा त्याच परिसरातील पात्र अधिकार्यास देणे आवश्यक असते. अंजनगाव सुर्जी कार्यालयातच यासाठी पात्र अधिकारी उपलब्ध असतानाही, एवढ्या दुरवरच्या खोडे यांना हा प्रभार देण्यात आला. ही बाब प्रशासकीय आणि कामकाजाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे तेव्हाी होते आणि आताही आहेच. शिवाय तत्कालीन गटविकास अधिकारी किसन खातळे यांनी याच नियमावर बोट ठेवत याच कार्यालयातील विस्तार अधिकारी दिलीप धनुजी खंडारे हे या पदभारासाठी सक्षम आहेत. त्यांना हा प्रभार अतिरिक्त दिल्यास शैक्षणिक दृष्ट्या सोयीच होईल, असे संबंधितांना लेखी कळवले होते. मात्र त्यांची शिफारस धुडकविण्यात आली.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी खोडे यांना प्रभार देण्यासाठी सीईओ महापात्र यांना पत्र दिले. त्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी खासदार बळवंत वानखडे यांनीही याच मागणीसाठी पत्र पाठविले. या दोन्ही राजकीय शिफारशीनंतर ५ जून २०२५ रोजी सीईओ महापात्र यांनी खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याचा आदेश काढला. पुढे २ जानेवारी २०२६ रोजी महापात्र यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे सादरीकरण झाले. त्यावेळी महापात्र, खासदार वानखडे व आमदार लवटे उपस्थितीत होतेच. पुढे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी खोडे यांचे उत्तरपत्रिका चोरी प्रकरण उघड झाले व त्यांना अटक झाली. तत्कालीन गटविकास अधिकार्यांनी लेखी पत्र देत हा निर्णय अयोग्य असल्याचे अप्रत्यक्ष नमूद केले होते. भाजपनेही खोडे यांना चार्ज दिल्याबद्दल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. मात्र या सर्व विरोधाला आणि तक्रारींना डावलून सीईओ महापात्र यांनी Sudhir Khode खोडे यांनाच चार्ज दिला. आता हे प्रकरण अंगलट आले आहे.