कारंजा लाड,
Undri-Zhodga तालुयातील कामरगाव सर्कलमधील शेतकर्यांना उंद्री व झोडगा लघु सिंचन प्रकल्पातून मिळणारे पाणी पाटसरीपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
यासंदर्भात पाटबंधारे विभाग, कारंजा येथे उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीला शरद तुमसरे (कामरगाव सर्कल प्रमुख, शिवसेना उबाठा) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार उंद्री व झोडगा लघु सिंचन प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी अनेक ठिकाणी कालव्यांमधून योग्य प्रकारे पुढे जात नसल्यामुळे शेवटच्या टोकावरील शेतकर्यांच्या पाटसरीपर्यंत पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर खा.संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रतिनिधींनी उप कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग कारंजा यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कालव्यांची दुरुस्ती करणे, मधल्या मार्गात पाणी कुठे वाया जाते याची तपासणी करणे तसेच नवीन परवानग्या व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकर्यांच्या पाटसरीपर्यंत Undri-Zhodga सिंचनाचे पाणी सुरळीत पोहोचण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. उप कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित समस्यांची दखल घेत कालव्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या बैठकीला शेतकरी पद्मकिशोर उंटवाल, प्रशांत सोळंके, योगेश टाके, दिनेश हरणे, मधुसूदन रहांगडळे, सचिन शिंगाळे, महेश पाटील बांबल आदी उपस्थित होते. दरम्यान, कालव्यांच्या दुरुस्तीमुळे आणि योग्य नियोजनामुळे परिसरातील शेतकर्यांना सिंचनाचे पाणी नियमित मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.