वैद्यकीय समाजसेवेचा नवा अध्याय; सेवांकुर!

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
वेध
प्रफुल्ल क. व्यास
medical social service sevankur शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या दोन गोष्टींचा समाज पर्यायाने देश उभारणीत मोठा हातभार आहे. परंतु, आज तो ‘होता’ असे म्हणावे लागते. कारण, ही दोन्ही क्षेत्र सध्या नाराजीच्या सुरात अडकत चालली आहेत. दोन्ही क्षेत्रात अपवाद आहेतच! त्या तुलनेत नाराजीची टक्केवारी काहीपट आहे. डॉक्टरांना ‘देव’ संबोधले जाते. परंतु, डॉक्टरांचे रुग्णांसोबत असलेले व्यवहार, रुग्ण भरती करण्यापूर्वी आगाऊ रकमेची मागणी करणे, अनावश्यक रक्त चाचण्या आदी अनेक बाबींविषयी समाज व्यवस्थेत प्रचंड नाराजी आहे. अगदी चार दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या.) येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णवाहिकेत मरणासन्न असलेल्या रुग्णाला रस्त्यावर सोडून रुग्णवाहिका परत बोलवण्याचा उद्दामपणा केला. परिणामी, त्याच रात्री तो रुग्ण दगावला. अशा या सोकावत जाणाऱ्या भावनांच्या भाऊगर्दीत वैद्यकीय शिक्षणातून समाजसेवेने मंतरलेली चळवळ भारतातील सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात सेवा देते झाली. डॉक्टर हा केवळ व्यावसायिक नसतो तर समाजाचा विश्वास आणि जीवनाशी जोडलेली जबाबदारी त्याच्यावर असते. अशाच विचारातून आणि राष्ट्रीय प्रेरणेतून सेवांकुर ही चळवळ उदयास आली.
 
 
 
वैद्यकीय समाजसेवेचा नवा अध्याय
 
1989 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे सात डॉक्टरांनी एकत्र येत डॉ. हेडगेवार हॉस्पिटलची स्थापना केली. समाजाच्या गरजा ओळखून वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि सेवेला केंद्रस्थानी ठेवत आरोग्यसेवा उभी केली. 1989 ते 1997 या काळात रुग्णालयाची प्रगती वेगाने होत गेली. हॉस्पिटलचा विस्तार झाला. 700 खाटांच्या मोठ्या रुग्णालयात रूपांतरित झाले. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट डॉक्टर बनवले जाते. त्याचबरोबर ते संवेदनशील नागरिक बनावेत, समाजातील दुःख समजून घ्यावे आणि सेवा करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी काहीतरी वेगळे करणे आवश्यक असल्याची जाणीव निर्माण झाली. यातूनच डॉक्टरांमध्ये आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजभान रुजवण्यासाठी एक नवीन चळवळ सुरू करण्याचा विचार पुढे आला. अनौपचारिक भेटींमधून सुरू झालेली चळवळ सुरुवातीला काही डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी आठवड्यातून एकदा अनौपचारिकपणे भेटू लागले. चर्चा होत, अनुभवांचे आदानप्रदान होऊ लागले. हळूहळू या उपक्रमाला आकार येऊ लागला. त्या चर्चांतून प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा मिळू लागली. गावाकडे जाऊन आरोग्य शिबिरे घेणे, समाजातील दुर्बल घटकांशी संवाद साधणे, ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांच्या अडचणी समजून घेणे अशी कामे सुरू झाली. याच विचारातून ‘सेवांकुर’चा जन्म झाला. सेवांकुर या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सेवा ही एक वृत्ती आहे आणि ती अंकुरासारखी रुजवावी लागते. योग्य संस्कार मिळाले तर हा अंकुर पुढे मोठ्या वृक्षात रूपांतरित होतो, हे या चळवळीने सिद्ध करून दाखवले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानावर समाधान मानू नये, तर प्रत्यक्ष समाजात जाऊन लोकांचे जीवन समजून घ्यावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी आपले ज्ञान वापरावे, हा सेवांकुरचा मूलभूत विचार आहे. द्वितीय सरसंघचालक गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याच चळवळीतून नाशिक येथे 300 खाटांचे रुग्णालय उभे झाले. सन 2015-16 च्या काळात सेवांकुरला एक संघटित स्वरूप प्राप्त झाले. विविध राज्यांमधील वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले जाऊ लागले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, देवगिरी विभाग, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, तेलंगणा, गोवा या राज्यातील जवळपास 260 वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे 1300 विद्यार्थी या चळवळीशी जोडले गेले आहेत. सेवांकुरचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपक्रम म्हणजे ‘वन वीक फॉर नेशन.’ या उपक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना आदिवासी आणि दुर्गम भागातील समाजजीवन जवळून अनुभवण्याची संधी दिली जाते. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी विद्यार्थी एक आठवडा आदिवासी भागात राहतात. ते त्या समाजातील कुटुंबांचे सदस्य होतात.medical social service sevankur त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतात आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या समजून घेतात. वैद्यकीय तपासणी शिबिरे, आरोग्य जनजागृती, पथनाट्य, स्वच्छता अभियान, बालक व महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन या माध्यमातून आदिवासी समाजाला बाहेरील जगाची ओळख करून दिली जाते. पुढील वर्षी या उपक्रमाला एक तप पूर्ण होणार आहे. ‘वन वीक फॉर नेशन’ या उपक्रमात आतापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश येथे सेवा दिली. रुग्णालयात बसून रोगांचा अभ्यास करणे एक गोष्ट, पण समाजात जाऊन लोकांच्या जीवनातील अडचणी समजून घेणे ही वेगळीच गोष्ट आहे. संभाजीनगरातील ‘सप्तर्षी’ डॉक्टरांनी सुरू केलेला प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. सेवांकुरच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावाचा अंकुर रुजत आहे. तोच भाव समाजातील अन्य घटकांमध्ये रुजावा... डॉक्टरांतील (अपवादात काही डॉक्टर देव आहेत) देव परत यावा...
9881903765