रमजानच्या अखेरीस अफगाण-पाकिस्तान संघर्ष पुन्हा भडकला

13 Mar 2026 09:51:09
इस्लामाबाद,
Afghan-Pakistani conflict पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र झाला आहे. अफगाण प्रशासनाने आरोप केला आहे की पाकिस्तानने त्यांच्या सार्वभौमत्वाचा भंग करत काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिका या भागांमध्ये हवाई हल्ले केले. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. कंधार येथील विमानतळाजवळील एका खासगी विमान वाहतूक कंपनीच्या इंधन साठवण केंद्रावरही हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
Afghan-Pakistan conflict
 
 
ही कंपनी संयुक्त राष्ट्रांच्या विमानांसह नागरी विमानसेवांना इंधन पुरवण्याचे काम करते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची भीती निर्माण झाली असताना हा हल्ला झाल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.तालिबान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यांमध्ये केवळ लष्करी ठिकाणेच नव्हे तर निवासी भागही प्रभावित झाले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून महिला आणि लहान मुलांचाही बळी गेल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी विमानांनी निर्जन आणि वाळवंटी भागातही स्फोटके टाकल्याचे सांगितले जात आहे.
 
अफगाण प्रशासनाने या कारवाईचा तीव्र निषेध करत ती क्रूर आक्रमकता असल्याचे म्हटले आहे. रमजानच्या शेवटच्या दिवसांत आणि ईदसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर असे हल्ले करणे अमानवी असल्याचेही त्यांनी नमूद केले. या घटनेला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही अफगाण प्रवक्त्यांनी दिला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचा तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही ठिकाणांवर हवाई कारवाई केल्याचा दावा केला होता. त्या वेळी तालिबानच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर अफगाण बाजूने प्रत्युत्तर देताना अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा आणि काही सीमाचौक्या ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे.
Powered By Sangraha 9.0