वर्धा,
wardha-news : फार्मसी ही केवळ औषधनिर्मितीपुरती मर्यादित नसून, ती मानव मन आणि आत्म्याच्या कल्याणासाठी केलेली निष्कपट सेवा व संशोधनाची साधना आहे. प्राचीन काळापासून आयुर्वेद, यूनानी आणि होमिओपॅथी यांसारख्या परंपरांमध्ये औषधे हा विश्वास आणि अध्यात्म यांचा संगम होते. आजच्या आधुनिक फार्मसीमध्येही हे तत्त्व जिवंत आहे, असल्याचे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी व अग्निहोत्री इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुत वतीने शिव शंकर सभागृहामध्ये आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलनात ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिनेश वंजारी, प्राचार्य डॉ. प्रसाद जुमडे, डॉ. जयश्री दलाल, डॉ. राम बावनकर, प्रा. प्रशांत वाके, डॉ निलेश वाघ, डॉ. खुशबू व्यास, डॉ. मोनाली वावरे, डॉ. बंडू कडू, प्रा. नेहा शेटे, प्रा. धनंजय सावरकर, प्रा. शैलेश पिसे, प्रा. अमितकुमार लोकडे, प्रा.वृशाली माकडे, प्रा.अंजली पाटील, प्रा. अभिजित डफ आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, फार्मसी ही अध्यात्माची साधना आहे जी औषधांद्वारे शरीर बरे करते आणि करुणा, नैतिकता व विश्वासाने आत्म्याला स्पर्श करते. कोरोना काळात विकसित झालेल्या लसी हे उदाहरण आहे. जिथे शास्त्रज्ञांनी परिश्रमाने जगाच्या आरोग्यासाठी योगदान दिले. भविष्यात अख आणि जीन थेरपी यांसारख्या तंत्रज्ञानाने वैयक्तिकृत औषधे तयार होत आहेत जी रोग्याच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करतात. ही प्रक्रिया अध्यात्मिक आहे, कारण ती मानव सेवेच्या उद्दात तत्त्वावर चालत असल्याचे ते म्हणाले. आजच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पंच महाभूते बाधित झाली आहेत. त्यामुळे पर्यावरणीय व मानवी आरोग्य संकट निर्माण झाले आहे. अश्या परिस्थितीत औषधनिर्माण शास्त्रावर मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. प्रसाद जुमडे यांनी प्रस्ताविक केले. प्रा. श्रद्धा तेलरांधे यांनी संचालन केले.