पुण्यात व्यावसायिक गॅसवर बंदी!

13 Mar 2026 14:18:24
पुणे,
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, ही सर्व चर्चा अफवा आहेत आणि जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गॅसच्या वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने पुरवठ्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला असून अत्यावश्यक सेवा सुरळीत चालतील, असे त्यांनी सांगितले. ल्हाधिकारी डुडी यांनी पुणेकरांना आवाहन केले की, घरगुती गॅस पुरेसा असल्यामुळे व्यावसायिक गॅसवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. नागरिकांनी रांगा लावू नयेत आणि पॅनिक होऊ नये. गॅस पुरवठा २५ दिवसाच्या अंतरावर नियमित सुरू राहील, रुग्णालये, हॉस्टेल, हॉटेल व खानावळी यांना पुरवठा तातडीने केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
tys
 
ब्लॅक मार्केटवर प्रशासनाची कडक नजर आहे. जास्त दराने गॅस विकल्यास गुन्हे दाखल करून सिलिंडर जप्त केला जाईल, तर वितरकाचा परवाना रद्द केला जाईल. आतापर्यंत काही ठिकाणी तीन-चार अशा कारवाई केल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी गर्दी व पॅनिक होत असल्याचे पाहून पोलिसांनी तिथे नियंत्रण ठेवले आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, जिल्ह्यातील प्रमुख तेल कंपन्या आणि वितरकांकडे घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे आणि नागरिकांना नियमित वितरण चालू आहे. रुग्णालये, आरोग्य संस्था, आपत्कालीन सेवा व विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहे यांना प्राधान्याने गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश सर्व वितरकांना दिले आहेत.जिल्हाधिकारी डुडी यांनी नागरिकांना सुचवले की, कुणीही कृत्रिम टंचाई निर्माण करून सिलिंडर महागात विकत असल्यास अथवा चुकीची माहिती पसरवत असल्यास प्रशासन कडक कारवाई करेल. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, अनावश्यक साठा ठेवू नयेत आणि तक्रारी असल्यास थेट गॅस वितरक किंवा जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0