गडचिरोली,
devashree-holi : गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी उल्लेखनीय कामगिरी करत माजी आमदार तथा भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका बिना होळी यांची कन्या डॉ. देवश्री होळी हिची विट्रो-रेटिना सुपर स्पेशालिस्ट (डोळ्यांच्या मागच्या पडद्याचे स्पेशेलायजेशन) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
डॉ. देवश्री होळी यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेजमधून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून एमएस (ऑप्थॅल्मॉलॉजी) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील एक वर्षांपासून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सेवा बजावली. या काळात त्यांनी 1000 पेक्षा जास्त नेत्र रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करून समाजसेवेचे कार्यही केले.
डोळ्यांशी संबंधित गुंतागुंतीच्या व सूक्ष्म आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विट्रो-रेटिना या सुपर स्पेशालिस्ट अभ्यासक्रमासाठी कर्नाटक राज्यातील हुबळी येथील एस. एम. जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांची निवड झाली आहे. हा अभ्यासक्रम नेत्ररोग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष तांत्रिक ज्ञान देणारा मानला जातो. यावेळी डॉ. देवश्री होळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अविनाश टेकाडे यांनी वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे 1 वर्ष सेवा केल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी व कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व मागास म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्ह्यातून येऊन वैद्यकीय क्षेत्रात एवढे मोठे यश संपादन करणे ही कौतुकास्पद बाब मानली जात आहे. डॉ. देवश्री होळी यांच्या या यशामुळे अनेक तरुण-तरुणींना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ. देवश्री होळी यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा मान उंचावला असून भविष्यात त्या नेत्ररोग क्षेत्रात अधिक उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.