बनावट टिप्पण्यांवर जिल्हाधिकार्‍यांच्या रंगीत स्वाक्षर्‍या

13 Mar 2026 19:26:51
उमेश ताकसांडे
वर्धा, 
colored-signatures-on-fake-comments : किरकोळ कामांना मान्यता प्रदान करणे, क्रीडा संकुलातील रिपेअरिंग ऑफ सॅनेटरी, ड्रेन, पाईप लाईन अ‍ॅण्ड चेम्बर्सच्या कामांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी चक बनावट टिप्पणी तयार करून कामांना मूर्तरुप दिल्याचे पुढे आले आहे. या बनावट टिप्पण्यांवर जिल्हाधिकार्‍यांच्या रंगीत स्कॅन केलेल्या स्वाक्षर्‍याही आढळून आल्याने कार्यालय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 

jn 
 
 
 
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील रिपेरिंग ऑफ ओपन जिम इविपमेंट, इन्स्टालेशन ऑफ न्यू ओपन जिम, वन साई चेनलिंग फेन्सिंग ऑफ बास्केटबॉल कोर्ट, आरओ मशीन रिपेअरिंग, कटींग ऑफ ट्रीज, रिपेअरिंग ऑफ टॉयलेट, डोअर आदी कामांचे कंत्राटदार विश्वकर्मा मजूर सहकारी संस्था मर्या. वर्धा यांना ५ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आले. हे देयक अदा करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या टिप्पणीमध्ये जिल्हाधिकार्‍यांची रंगीत स्वाक्षरी स्कॅन केलेली आढळून येते. मूळ टिप्पणीमध्ये क्रीडांगण विकास अनुदान २०२३-२४, धनादेशावर स्वाक्षरी करण्याबाबत असा उल्लेख होता. त्यामुळे या बनावट टिप्पणीची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
 
 
सन २०२३-२४ मध्ये क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून कुस्ती खेळाची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज तयार करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृहाचे बांधकाम, सिंथेटिक टेनिस कोर्ट आणि सिंथेटिक बास्केटबॉल तयार करणे या सहा कामांकरिता ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. ६ मार्च २०२४ रोजी जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. सदर निधी जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापनाच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आला. मात्र, सदर कामाचे अंदाजपत्रक व प्रत्यक्षात झालेल्या कामांमध्ये तफावत दिसून येते. तर संदर्भीय २ ची टिप्पणी ११ मार्च २०२४ च्या बनावट टिप्पणीमध्ये प्रसाधनगृह, पाण्याची सुविधा, क्रीडांगणावर ड्रेनेज आणि कुस्ती खेळाची सुविधा तयार करणे ही कामे तुर्तास स्थगित करण्याबाबत कळविले. परंतु, सदर टिप्पणी ही बनावट तयार करण्यात आली असून ती कामं जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.
 
 
जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन खात्याच्या बँक विवरणात २० जून २०२४ रोजी क्रीडांगण विकासासाठी ४२ लाख व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेचे ७ लाख असे ४९ लाख रुपये जमा करण्यात आले. त्यापैकी ६ जुलै २०२४ रोजी १० लाख, ३१ जुलै ५ लाख, ३१ जुलै २०२४ रोजी ७ लाख, ३१ जुलै २०२४ रोजी १० लाख, ३१ जुलै २०२४ रोजी ७ लाख, २५ ऑटोबर २०२४ रोजी १० लाख असा ४९ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधी आणि जिल्हा क्रीडा संकुलात झालेला खर्च ही दोन्ही रकम जुळत असून सदर कामाच्या विनियोग प्रमापत्र सुद्धा जिल्हा नियोजन अधिकारी वर्धा तसेच महालेखाकार नागपूर यांना सादर करण्यात आले आहे. मात्र, झालेल्या खर्चाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडा अधिकारी निमगडे यांच्याविरुद्ध झालेल्या चौकशीमध्ये बचावाकरिता बनावट टिप्पणी तयार करण्यात येत असून सदर बनावट टिप्पणीवर जिल्हाधिकार्‍यांच्या रंगीत स्कॅन केलेल्या स्वाक्षरी हा गंभीर प्रकार दिसून येतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही कार्यालय वर्तुळातून होत आहे.
Powered By Sangraha 9.0