हिंगणघाट,
domestic-gas-cylinder-seized : गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. अशातच एस्मा कायदा लागू होऊनही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे शुक्रवारी तालुकास्तरीय पथकातील अधिकार्यांच्या निदर्शनास आल्याने ५ ठिकाणांहून एकूण ७ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवार ६ रोजी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी ५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले होते.
गॅस सिलिंडर तुटवड्याचा भडका उडू नये या हेतूने केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यात ९ भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. आज शुक्रवारी हिंगणघाट येथे तालुयाच्या पथकाने पाच व्यावसायिक प्रतिष्ठानांतून सात घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिकसाठी वापर होत असल्याचा ठपका ठेवत जप्त केले. यात अश्विन अमृततुल्य सेंटर येथून ३ तर अजीत बिर्याणी सेंटर, जय महाराष्ट्र पावभाजी सेंटर, रवी नास्ता सेंटर व गजानन हॉटेल या व्यावसायिक प्रतिष्ठानातून प्रत्येकी एक घरगुती गॅस सिलिंडर जप्त केल्याचे सांगण्यात आले.