सिलेंडर तुटवड्याने शिक्षकांच्या अडचणीत भर!

13 Mar 2026 17:53:40
वर्धा,
Gas cylinder shortage शाळेतील मुलांसाठीचा पोषण आहार शिजविण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार २०७ शाळांपैकी १ हजार ३८ शाळांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. युद्धामुळे सध्या जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सिलेंडर मिळविण्यासाठी सध्या शिक्षकांना चांगलीच माथापच्छी करावी लागत असून अशीच परिस्थिती राहिल्यास चुलीवर पोषण आहार शिजविण्याची वेळ येणार आहे.
 

Gas cylinder shortage 
पोषण आहार शिजविण्यासाठी लागणार्‍या इंधन खरेदीसाठी कुठलीही आर्थिक तरतुद नियमांमध्ये नाही. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
 
 
गॅस सिलिंडर तुटवड्याचा मोठा भडका उडू नये म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केला आहे. अशातच आता काही व्यावसायिकांकडून नियमांना बगत देत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर केला जात आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरील बंदी घालण्यापूर्वी जिल्ह्याला नेमका किती व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हायचा याची साधी माहिती प्रशासनाकडे नाही. घरगुती गॅस सिलेंडरचा नियम डावलत कमी-अधिक प्रमाणातही व्यावसायिक वापर झाल्यास घरगुती गॅस सिलेंडर वितरणावर मोठा परिणाम होणार आहे. कुपोषणमुत भारतासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार शिजवून त्याचे वितरण केले जाते. पण, सिलेंडर मिळविण्यासाठी तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागत असल्याने त्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. आणखी दीड महिना शाळा आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविण्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न होण्याच्या स्थितीत आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने आम्ही शिक्षण उपसंचालक पुणे यांना निवेदनही पाठविले असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी कळवले आहे.
Powered By Sangraha 9.0