५.५८ लाख रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार

13 Mar 2026 18:07:59
मालेगाव,
Malegaon tehsil तहसील कार्यालय मालेगाव येथे बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय रकमेचा अपहार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयातील नायब नाझर यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

 Government fund fraud, Malegaon tehsil, 
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयात कार्यरत नायब नाझर शेषनारायण सूर्यभान शेवलकर (वय ५७ ) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तहसील कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालेगाव शाखेतील चालू खात्याच्या व्यवहारांची तपासणी करताना अनियमितता आढळून आली. १० मार्च २०२६ रोजी बँक स्टेटमेंट तपासले असता ५ मार्च २०२६ रोजी धनादेश क्रमांक २५९३७२ द्वारे २ लाख ७७ हजार ६४ रुपये तसेच ९ मार्च २०२६ रोजी धनादेश क्रमांक २५९४६५ द्वारे २ लाख ८१ हजार ४५५ रुपये इतकी रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर धनादेशांची तपासणी केली असता त्यावरील शिक्का व स्वाक्षर्‍या बनावट असल्याचे आढळून आले.
पुढील तपासात धनादेश पुस्तिकेतील क्रमांक २५९३६६ ते २५९४६५ पर्यंतचे कोरे धनादेश गहाळ असल्याचेही समोर आले. एखाद्या अज्ञात व्यक्तीने तहसील कार्यालयाच्या नावाने बनावट पत्र व बनावट कार्यदौवरण क्रमांक तयार करून गहाळ धनादेशांचा वापर केल्याची शयता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित आरोपींच्या बँक खात्यात एकूण ५ लाख ५८ हजार ५१९ रुपयांची शासकीय रक्कम जमा करून तिचा अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची माहिती तहसीलदार मालेगाव यांना देण्यात आली असून त्यांच्या निर्देशानुसार संबंधितांविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग इंगळे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0