अग्रलेख...
harish rana जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा श्वास सुरू असतो तोवर तो जिवंत असतो. ज्या क्षणी श्वास संपतो, त्या क्षणी त्याचा जिवंतपणा संपतो. म्हणजे, जिवंत असणे हे केवळ दोन श्वासांमधील अंतर असते. त्याला जीवन असे म्हटले जाते. जिवंत असणे आणि जगणे यांमध्ये मात्र फार मोठे अंतर असते. जन्माला आलेला प्रत्येक जण मरण येईपर्यंत जिवंत असला, तरी केवळ श्वास सुरू असल्यामुळे पुढे सरकत राहिलेल्या या जिवंतपणाच्या काळाला त्याने किती न्याय दिला, तो काळ कसा जगला, यावर जगण्याचे सार्थक झाले किंवा नाही ते ठरविले जाते. कारण आयुष्य ही अपघाताने मिळालेली देणगी असते. जन्माला येणे किंवा कोणत्या जन्माला येणे हे माणसाच्या इच्छेवर अवलंबून नसते. तसेच, माणसाचा जन्म देताना, हे जीवन त्यांना हवे आहे किंवा नाही, असा प्रश्न नियती त्याला विचारत नसते. जन्म हा आपल्या इच्छेनुसार करता येणारी निवड नसते. तो आपल्याला निसर्गाने, नियतीने किंवा ईश्वराने दिलेला एक अपरिहार्य वारसा असतो. ते स्वीकारायचे की नाही, हे आपण ठरवू शकत नसतो, तरी आपल्या वाट्याला आलेले जीवन कसे जगायचे, त्याला कोणता अर्थ आणि आकार द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो. काही जण परिस्थितीच्या ओझ्याखाली दबून जाऊन जगणे नियतीच्या हवाली करत हवालदिलपणे जगतात, काही जण परिस्थितीशी संघर्ष करत परिस्थितीला आव्हाने देत जगणे सार्थकी लावतात, तर काही जण त्याच परिस्थितीतून आशेचा किरण शोधतात. जीवनात येणाऱ्या संकटांना शरण जाणे ही एक निवड असते, तर त्यांचा सामना करून त्यातून नवे मार्ग शोधणे ही दुसरी. म्हणूनच जीवनाची लांबी किती होती, यावर जगण्याचा अर्थ ठरत नसून निसर्गाने दिलेल्या जन्माचे जगणे झाले किंवा नाही यावर ठरत असतो. समोर येणारा प्रत्येक दिवस आपल्यासमोर नवी आव्हाने, नव्या शक्यता, नव्या संधी आणि अनेकदा नवी संकटेदेखील घेऊन येत असतो. त्याकडे कोणत्या नजरेने पाहायचे आणि त्यापैकी कोणत्या गोष्टीचा स्वीकार करायचा ते आपण ठरवायचे असते. जीवन जगण्याची ही खरी ताकद असते.
ही ताकद गमावली की जगणे म्हणजे केवळ श्वास घेणे असते. असा जन्म मिळणे, असे आयुष्य वाट्याला येणे हेदेखील अनेकदा आपल्या हातात नसते, त्यामुळेच असे आयुष्य जगत राहायचे किंवा नाही, हे ठरविणे तरी आपल्या हातात असले पाहिजे, या मागणीच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता काहीशी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जीवन जगण्याची हीच स्वातंत्र्यपूर्ण निवड माणसाला, त्याच्या अस्तित्वाला अर्थ देण्याची ताकद प्रदान करते, या विचारांना मान्यता मिळण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोरील एका मानवतावादी खटल्याच्या निकालात न्यायालयानेही हाच विचार केल्याने, जिवंत राहणे आणि जगणे यांच्यातील फरक आता स्पष्ट होणार आहे. श्वास घेणारा प्रत्येक सजीव काळासोबत जिवंत राहात असतो, पण त्याचे जिवंत असणे निर्जीव वस्तूच्या अस्तित्वासारखेच अस्तित्वहीन असेल, त्याला सन्मानाने जगण्याचा हक्क बजावता येत नसेल, तर त्याला सन्मानपूर्वक मृत्यूला सामोरे जाण्याचा हक्क तरी मिळावयास हवा, यावर गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सामाजिक विचारमंथनातून काही ठोस निष्पन्न होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
पंजाब विद्यापीठात शिक्षण घेत असताना एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून अंतर्बाह्य शारीरिक दुखापतींमुळे गेल्या 13 वर्षांपासून मरणासन्न बेशुद्धावस्थेत असलेल्या हरीश राणा या तरुणास कृत्रिमरीत्या जिवंत ठेवण्यासाठी लावलेली जीवरक्षक उपचार प्रणाली काढून त्याला सन्मानपूर्व नैसर्गिक मृत्यू पत्करण्यास परवानगी मिळाली. या मागणीसाठी त्याच्या जन्मदात्यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेतून एका प्रदीर्घ चळवळीला बळ मिळाले आहे. वैद्यकीय भाषेत ज्याला निष्क्रिय इच्छामरण म्हटले जाते, त्यास न्यायालयीन परवानगी देणारा हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. जन्माला येणाèया प्रत्येकास सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क आहे, असा निकाल सन 2018 मध्येच देऊन सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे निष्क्रिय इच्छामरणाच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना आशेचा किरण दाखविला होता. आता हरीश राणा याच्या प्रकृतीची संपूर्ण तपासणी करून घेतल्यानंतर त्याचा प्रकृतीत पूर्ववत सुधारणा होण्याची व तो पूर्णपणे ठणठणीत होण्याची सूतराम शक्यता नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्याच्या निष्क्रिय इच्छामरणाच्या हक्कावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. जीवरक्षक उपचार प्रणालीद्वारे केवळ जिवंत राहण्यापेक्षा ती प्रणाली बंद करणे हा त्याच्या सन्मानाने जगण्याच्या व सन्मानपूर्वक मरण्याच्याही हक्काचा सन्मान ठरेल, असाच विचार कदाचित न्यायालयाने केला असावा. कारण, निकालपत्राच्या प्रारंभीच न्यायालयाने जगणे आणि जिवंत असणे यांतील फरकाचा परामर्ष घेतलेला दिसतो. ‘तुला जन्म हवा आहे किंवा नाही असे ईश्वर कोणाही व्यक्तीस विचारत नसतो. त्यामुळेच जन्माला येणे ही कोणाच्या पसंतीची किंवा नापसंतीची बाब नसते. ते स्वीकारावेच लागते, म्हणून जन्माला आल्यानंतर आयुष्य कसे जगायचे हे ठरविण्याचा अधिकार त्याला असतो’ हे हेन्री वॉर्ड बीचर या अमेरिकन धर्मोपदेशकाचे वाक्य निकालपत्रात उद्धृत करून न्यायालयाने हरीश राणा यास सन्मानाने मरण देण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असावा.
सुमारे 10 वर्षांपूर्वी, 18 मे 2016 या दिवशी, मुंबईतील अरुणा शानबाग नावाच्या एका परिचारिकेच्या तब्बल चार दशकांच्या जीवनमरणाच्या संघर्षाचा शेवट झाला, तेव्हाच सन्मानपूर्वक मृत्यूच्या मागणीची दीर्घकाळापासून प्रतीक्षा पुन्हा एकदा प्रबळ झाली होती. जिवंतपणी मरणयातना भोगल्याने माणूसपण हरवलेली अरुणा शानबाग नावाची ही महिला जवळपास 40 वर्षे मुंबईच्या केईएम इस्पितळाच्या बिछान्यात केवळ संवेदनाहीन अवस्थेत पडून राहिलेली होती. अशा मरणप्राय जिवंतपणातून तिला मुक्ती द्यावी, यासाठी दयामरणाचा किंवा इच्छामरणाचा लढा तिच्या संवेदनाहीन जिवंतपणीच सुरू झाला होता. सजीवपणाचे लक्षण असलेल्या सर्व संवेदना हरवलेल्या अवस्थेत किंवा जगण्यामरण्याच्या जाणिवा संपलेल्या अवस्थेत केवळ श्वास घेत जगत राहण्यापेक्षा, समाधानाने मृत्यूला सामोरे जाण्याची किंवा मरण देण्याची मागणी अनेक दशकांपासून अनेकांकडून सातत्याने सुरू होती. जन्म घेणे आपल्या हाती नाही, पण मरण तरी आपल्या हाती असले पाहिजे, असा दावा करीत इच्छामरणाचे असंख्य पुरस्कर्ते सरकार दरबारी याचना करीत वर्षानुवर्षे कायद्याकडे डोळे लावून बसले होते.
खरे म्हणजे, ‘मृत्यू’ हेच जिवंतपणाचे एकमेव लक्षण असते. कारण मृत्यू हा केवळ जिवंतांच्याच वाट्याला येणारा नैसर्गिक आविष्कार असतो. असंख्य निर्जीव दगडधोंडे वर्षानुवर्षे त्याच स्थितीत पडून असतात. त्यांच्या जन्माला स्वयंभू कहाण्या नसतात. त्या निरीच्छ दगडाधोंड्यांना कसल्याच संवेदना नसतात. सृष्टीतील सुख-दुःखाच्या कोणत्याही घडामोडींचा त्यांच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नसतो आणि त्यांना मृत्यूची वेदनाही नसते. पण म्हणून त्या दगडधोंड्याच्या अस्तित्वाचा कुणी कधी हेवा करत नाही. म्हणून सजीवपण हे वेगळेपण ठरते आणि मृत्यू हा त्याचा शेवटचा क्षण असतो. अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या, केवळ मरण येत नाही एवढेच जिवंतपणाचे लक्षण असलेल्या व्यक्तीस दयामरण देण्यासंदर्भातील कायदा करण्यापूर्वी जनमत आजमावण्याचा एक निर्णय त्याच काळात केंद्र सरकारने घेतला. इच्छामरण, दयामरण या बहुचर्चित विषयाचे अनेक अंगांनी मंथन सुरू झाले. सन्मानाने जगण्याची कोणतीच लक्षणे उरलेली नसल्याच्या अवस्थेत जगणाèया रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दयामरण हा सन्मानपूर्वक मृत्यू तरी ठरेल, असा मतप्रवाह चर्चेत आला. आसन्नमरण अवस्थेतील व्यक्तीला उपचाराने जगविणे हे नैसर्गिक जगणे ठरणार नाही; त्याला तशा अवस्थेत जगविणेदेखील उचित नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण मान्य करीत असले, तरी जगविणे हीच त्या क्षेत्राची नीती असल्याने दयामरण हे वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेला धरून नाही, असाही दावा केला गेला होता. अरुणा शानबाग यांना दयामरण देण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना, इच्छामरण हा गुन्हा नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले होते.harish rana त्यामुळे दयामरण आणि इच्छामरणाच्या मुद्यावर सकारात्मक विचार करण्याची एक मानसिकता तरी सुदृढ होऊ लागली. सन्मानाने जगण्याचा कायदेशीर हक्क जरी घटनेनेच प्रत्येकाला दिला असला, तरी असे सन्मानाचे जगणे हे अनेकांसाठी अजूनही स्वप्नवतच आहे. सन्मानाने जगविण्याची जबाबदारी असलेल्यांपुढे, तशी परिस्थिती निर्माण करण्याचे मोठे आव्हान सदैव उभे आहे. ते आव्हान पेलविण्याची क्षमता अंगी येत नाही, तोवर सन्मानाने मरण्याचा मार्ग मोकळा करण्यात काहीच गैर नाही. मृत्यू ही आनंददायी घटना नाही, हे आपण भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले सत्य असले, तरी मृत्यू टाळता येत नाही, हेदेखील सत्य आहे. हरीश राणा याच्या सन्मानपूर्वक मरणाच्या मागणीस मान्यता दिल्याने त्याचे पुढचे पाऊल उचलले गेले आहे.