विजय पांढरीपांडे
wars युद्ध का होतात हा मला पडलेला प्रश्न आहे. माझे राजकारणाचे ज्ञान मुळातच मर्यादित आहे. आजकाल अवतीभवतीचे राजकारण इतके गलिच्छ झाले आहे की, त्याबद्दल खोलात न शिरलेलेच बरे! युद्धाचा संबंध आंतरराष्ट्रीय राजकारणाशी असतो. तो विषय तर अधिकच किचकट! आपल्याकडे अगदी रामायण-महाभारतापासून युद्धाच्या सुरस चमत्कारिक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय. ‘युद्धस्थ कथा रम्या’ असे प्रचलित वचन आहे. शाळेत अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इतिहासातील युद्धाच्या सुरस कथा आपण वाचल्या आहेत. मार्क मिळविण्यासाठी ती सनावली पाठदेखील केली आहे; पण त्यातून काहीच शिकलो नाही. कारण त्या वयात शिकण्यासारखे काही नव्हतेच त्या इतिहासात. पुढे होऊन गेलेल्या दोन महायुद्धाच्या कथा काहींनी अभ्यासल्या असतील, वाचल्या असतील. तरीही नेमकी युद्धे का होतात? एकमेकाच्या सहकार्याने जगू पाहणारा, प्रगती करणारा माणूस एकमेकाच्या अंगावर का धावून जातो? एकमेकांचा संहार करण्याला का प्रवृत्त होतो?
तसे पाहिले तर एकूणच जगाच्या बहुतांश भागात भरपूर प्रगती झाली आहे. माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याइतकी समृद्धी आली आहे. समाजात गरिबी-श्रीमंती असे भेद असले, तरी पूर्वीइतकी हलाखीची परिस्थिती फार कमी भागात आहे पूर्वीच्या तुलनेत. मुख्य म्हणजे जे युद्धासाठी सरसावले आहेत ते सगळे बèयापैकी चांगले जीवन जगताहेत. शांततेत जगले तर ते अधिक पुढे जाऊ शकतात. अवतीभवतीची परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चांगली घडवू शकतात. स्वतःच्या सर्व गरजा पूर्ण करून इतरांना बरेच काही देऊन सुखी करू शकतात. मग या राष्ट्रप्रमुखांना ही युद्धाची अवदसा का आठवते? हा भीषण नरसंहार, हे अमानुष क्रौर्य कशासाठी? समाज कितीही प्रगत झाला तरी त्याची मूलभूत स्वार्थी प्रवृत्ती बदलत नाही. जे काही चांगले ते फक्त मलाच, आम्हालाच मिळाले पाहिजे. इतरांना म्हणजे कधीतरी केव्हातरी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, ज्यांच्यामुळे आपल्याला अडचणी आल्या, त्यांना आपल्या सुखात आपल्याला सहभागी करून घ्यायचे नसते. याला वर्णभेद, वंशभेद, जातिभेद... काहीही नाव द्या. समाज जसजसा विकसित झाला तशा या भेदाच्या पोलादी भिंती अधिकाधिक उंच होत गेल्या. विषमता वाढतच गेली. द्वेष-मत्सर भावना कमी होण्याऐवजी तीव्र होत गेली. प्रत्येकाचे आपापले धर्मग्रंथ आहेत. पारंपरिक संस्कारातून आलेली चांगली शिकवण आहे. कुठलाही धर्म, कुठलीही संस्कृती इतरांचे वाईट करा, इतरांना तुच्छ लेखा, एकमेकांचा संहार करा,असे मुळीच सांगत नाही. भाषा वेगळी असेल, सांगण्याची पद्धत वेगळी असेल, पण प्रत्येक धर्म, प्रत्येक राष्ट्राची संस्कृती ही प्रेम, दया, सहानुभूतीचीच शिकवण देते. तरीही युद्धे का होतात? लोकशाही मार्गाने निवडून आलेली, स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारी सुशिक्षित नेते, राज्यकर्ते एकदम थेट युद्धाचे रणशिंग का फुंकतात? हा विनाशी निर्णय घेणाèया नेत्यांच्या मागे त्यांचे लोक असतात का? त्यांनाही हा भीषण नरसंहार, रक्तपात मान्य असतो का? तसे वाटत नाही. कारण सामान्य माणसाला सुखा-समाधानात, शांतीने जगण्यात रस असतो फक्त. देशाच्या सीमा, त्यावरून होणारे वाद, दोन देशातले व्यापारी संबंध, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव यामुळे त्याच्या आयुष्यावर फारसा काही फरक पडणार नसतो. त्याच्या, कुटुंबाच्या गरजा पूर्ण झाल्या की सामान्य माणूस सुखी-आनंदी असतो.wars हे राजकारण, हा धार्मिक द्वेष, हा वर्ण-वंश भेद ही मूठभर सत्ताधारी राजकारणी मंडळींची मक्तेदारी असते. ही त्यांची वैयक्तिक मिजास असते. स्वतःचा अहं जोपासण्यासाठी, स्वतःचे राजकीय महत्त्व राखण्यासाठी, खरे म्हणजे स्वतःची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी ही निवडक मंडळी हा जीवघेणा खेळ खेळत असतात.
सध्या हेच चालू आहे. महाभारतापासून चालत आलेल्या, पहिल्या-दुसèया महायुद्धात पुनरावृत्ती झालेल्या नाटकाचीच ही नवी आवृत्ती आहे. यात निरपराध स्त्रिया-मुलांचे जीव जातील, सीमेवरचे हजारो सैनिक मारले जातील, शहरे उद्ध्वस्त होतील, रोगराई वाढेल, जागतिक अर्थव्यवस्था कोसळून पडेल. खरे तर आपल्यापैकी कुणालाच हे नको आहे. कुठल्याही देशाच्या नागरिकांनी त्यांच्या राष्ट्र प्रमुखांना या सर्वनाशाचे, निरपराध नागरिकांचे, स्त्रिया-मुलांचे जीव घेण्याचे, नागरी संपत्ती नष्ट करण्याचे, झालेला विकास भुईसपाट करण्याचे अधिकार त्यांच्या राज्यकर्त्यांना दिलेले नाहीत. जे कुणी दहशतवादी असतील, जागतिक शांततेच्या आड येत असतील, निरपराध नागरिकांवर अत्याचार करत असतील, अशा मूठभर विद्रोह्यांना जरूर कठोर शिक्षा द्या. त्यांना हवे तर फाशी द्या; पण आपल्या सत्तालोलूप वृत्तीपायी, स्वार्थ जोपासण्याच्या हट्टापायी हे मूठभर शासन करते. जर जगाला वेठीस धरणार असतील तर हे आपण किती खपवून घ्यायचे, हा खरा प्रश्न आहे. मला उत्तर माहिती नाही. कारण मला यातले फारसे काही कळत नाही!
7659084555