अमरावती,
ravindra metkar प्रगतीशील शेतकरी व यशस्वीपणे कुकूटपालन करणारे आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी रवींद्र मेटकर यांना ग्लोबल इकॉनॉमिक फोरम (GEF) आणि लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल्स डेव्हलपमेंटच्या (LOSD) वतीने, १ ते ५ मे या कालावधीत युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात होणाऱ्या ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्समध्ये निमंत्रित करण्यात आले आहे.
यावर्षीच्या परिषदेचा विषय "एआय फॉर एव्हरी माइंड" हा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि समकालीन आव्हानांचा शोध घेणे तसेच वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल युगाशी जुळवून घेण्याच्या धोरणांवर सदर विषयाच्या अनुषंगाने परिषदेत चर्चा होणार आहे. या परिषदेत जगभरातील संशोधक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि इतर तज्ञ एकत्र येणार आहे.
रवींद्र मेटकर यांना एक यशस्वी भारतीय कृषी उद्योजक म्हणून या परिषदेत बोलाविण्यात आले आहे. तुमच्या अनुभवाचा परिषदेदरम्यान होणाऱ्या चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी फायदा होणार असल्याचे ग्लोबल इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. हरी कृष्ण मरम यांनी रवींद्र मेटकर यांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रात स्पष्ट केले आहे.
शेती आणि शेती पुरक व्यवसायावर रवींद्र मेटकर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यांचा अमरावती जवळील अंजनगाव बारी येथे अत्याधुनिक मातोश्री पोल्ट्रीफार्म देशात आदर्श पोल्ट्रीफार्म म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक कृषी चर्चासत्रात त्यांनी भाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.ravindra metkar केंद्रीय व राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रात योगदान दिले आहे. सतत कार्यमग्न राहणाऱ्या रवींद्र मेटकर यांना शेतीत वेगवेगळे प्रयोग करून संशोधन विकसित करण्याची आवड आहे. प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात होणाऱ्या परिषदेचे निमंत्रण मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.