तेहरान,
Iran attacks NATO base in Turkey मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने तुर्कीमधील उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या लष्करी तळाला लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चिंता व्यक्त केली जात आहे, कारण या तळावर मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने आखाती प्रदेशातील अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानांच्या साहाय्याने हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर इराणने तुर्कीमधील इन्सिर्लिक येथील लष्करी तळावरही हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज आणि सतर्कतेचे इशारे देणारे सायरन ऐकू आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. काही अहवालांनुसार हा हल्ला मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश आले. या लष्करी तळावर अमेरिकेची सुमारे पन्नास अणुबॉम्ब साठवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. उत्तर अटलांटिक करारानुसार अमेरिकेने हे अण्वस्त्र तेथे ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणावर हल्ला झाल्याची बातमी समोर येताच जागतिक सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, या संघर्षाचा विस्तार इतर देशांपर्यंतही होत असल्याचे दिसत आहे. इराणने इराकमधील फ्रान्सच्या लष्करी तळावरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिका इराणवर सातत्याने हवाई हल्ले करत असल्याचे सांगितले जात आहे. इराणची राजधानी तेहरान येथेही सतत बॉम्बहल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच इस्रायलने लेबनॉनवरही वारंवार हल्ले सुरू ठेवले आहेत. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून जगभरातील देश या संघर्षाकडे चिंतेने पाहत आहेत.