नागपूर,
nagpur-weather : गेल्या दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके जाणवत असताना १३ ते १६ मार्चदरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात मेघगर्जनेसह गारपिटीचीही शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रविण कुमार यांनी दिली आहे.
शनिवार, रविवारला पावसाची शक्यता
मुख्यत: शुक्रवारपासून वातावरणात बदल अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरातील कमी पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती, अशा दुहेरी संकटामुळे पुढील दोन-तीन दिवस वातावरणात बदल दिसून येणार आहे. शुक्रवारी पावसाची शक्यता नाही, मात्र ढगाळ वातावरण राहील. शनिवार, रविवारला पावसाची शक्यता आहे. यापूर्वी अनेकवेळा मार्च महिन्यात नागपूरला वादळी पावसाचा फटका बसला आहे. वादळी पावसामुळे नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली व या जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वच जिल्हयात उष्णलाटेचा प्रभाव
नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्हयात उष्णलाटेचा प्रभाव दिसून येत आहे. शुक्रवारी नागपूरचा पारा ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक तापमान ४१.८ अंश सेल्सिअस अमरावतीचे होते. अकोला ४१.५, ब्रम्हपूरी ४१.४ अंश कमाल तापमान नोंद झाले.