तभा वृत्तसेवा
मारेगाव,
fake-calls-on-dial-112 : ‘डायल 112’ या आपत्कालीन सेवेवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची दिशाभूल होत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
गुरुवार, 12 मार्च रोजी सकाळी डायल 112 वर खंडणी शेतशिवारात दारू विक्री होत असल्याची माहिती देणारा कॉल आला. त्यानुसार पोलिस नरेंद्र प्रभाकर तुमराम व अतुल सरोदे आणि गृहरक्षक सोमलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर कोणतीही दारू विक्री होत नसल्याचे आढळून आले.
दरम्यान, माहिती देणारा सुनील पोतू आत्राम (वय 36, जानकाई पोड, ता. मारेगाव) हा घटनास्थळी दारूच्या नशेत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत धक्कादायक बाब समोर आली.
संबंधित आरोपीने 11 मार्चच्या रात्रीपासून 12 मार्चच्या पहाटेपर्यंत 112 वर वारंवार खोटे कॉल करून दारूविक्रीची खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांना वारंवार घटनास्थळी जावे लागले आणि प्रशासनाचा वेळ व साधनांचा अपव्यय झाला.
या प्रकारामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आपत्कालीन सेवेचा गैरवापर झाल्याने मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 217, 221 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार दत्तू किनाके करीत आहेत.
मारेगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 ही आपत्कालीन सेवा अत्यंत महत्त्वाची असून तिचा गैरवापर करू नये. खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल करणाèयांवर कठोर कारवाई केली जाईल.