वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू

13 Mar 2026 20:12:59
मूल, 
shepherd-dies-in-tiger-attack : तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यावेळी शेळ्या-मेंढ्यांची शेतशिवारात राखण करणार्‍या एका मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गुरूवार, 12 मार्च रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
jlk
 
 
 
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील वासुदेव कंकलवार हे शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन फिस्कुटी येथील शेतशिवारातील महाकाली मंदिर परिसरात मुक्कामी होते. रात्रीच्या वेळी ते आपल्या भावासोबत शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाजवळ राखण करण्यासाठी झोपलेले असताना गुरूवारी रात्री वाघाने अचानक हल्ला केला. त्यात ते जागीच ठार केले. हल्ल्यानंतर वासुदेव कंकलवार यांचा शोध घेतला असता नातेवाईकांना घटनास्थळाजवळच त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पुढील तपासणी व विच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पीडित मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आप्त परिवार आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची तात्काळ मदत केली आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जुनासूर्ला ग्रामपंचायतचे सरपंच रंजीत समर्थ व फिस्कुटी ग्रामपंचायतचे सरपंच नितीन गुरनूले यांनी वनविभागाकडे केली आहे.
Powered By Sangraha 9.0