बर्लिन,
Spying with the help of cockroaches सध्या इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे जागतिक चर्चा तापलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक अनोखी माहिती समोर आली आहे. लवकरच युद्धभूमीत ड्रोनसह जिवंत झुरळांचाही वापर होणार आहे. जर्मनीतील हेल्सिंग या स्टार्ट-अप कंपनीकडून झुरळांची विशेष सेना तयार केली जात आहे. या झुरळांचा उपयोग हेरगिरीपासून प्रत्यक्ष लष्करी मोहिमांपर्यंत केला जाणार आहे. शास्त्रज्ञ झुरळांचे रोबोटिक रूप विकसित करत आहेत. प्रत्येक झुरळाच्या पाठीवर अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक पिशवी बसवली जाते, ज्याला 'झुरळ-सायबॉर्ग' असेही संबोधले जाते. या पिशव्यात सेन्सर्स, कॅमेरे आणि दळणवळण यंत्रणा बसविल्या जातात. यामुळे झुरळ शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून तात्काळ माहिती गोळा करू शकतात.

हे तंत्रज्ञान अशा ठिकाणांसाठी तयार करण्यात आले आहे जिथे मानवी हालचाल, ड्रोन किंवा पारंपरिक रोबोट प्रवेश करणे कठीण असते. कोसळलेल्या इमारती, अरुंद बोगदे किंवा युद्धक्षेत्रे यांसारख्या कठीण वातावरणात झुरळ सहज घुसखोरी करू शकतात आणि महत्त्वाची माहिती गोळा करू शकतात. झुरळांच्या पाठीवर असलेला सूक्ष्म पिशवीमधील उपकरणे 'तात्काळ माहिती' प्रसारित करू शकतात. शास्त्रज्ञ दूरस्थ विद्युत संकेताद्वारे झुरळांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतात. काही परिस्थितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने झुरळ एकत्रितपणे थव्याप्रमाणे काम करू शकतात, ज्यामुळे मोठ्या क्षेत्रावर पाळत ठेवणे सोपे होते.
शास्त्रज्ञांच्या मते झुरळ हे निसर्गातील अत्यंत टिकाऊ आणि कणखर जीव आहेत. ते अरुंद जागेतून सहज मार्ग काढू शकतात आणि कठीण परिस्थितीत जिवंत राहतात. याशिवाय, त्यांच्या शरीरावर हलकी उपकरणे वाहून नेण्याची क्षमता देखील आहे. सध्या पाठीवर सुमारे १० ते १५ ग्रॅम वजनाचा पिशवी बसवता येतो, ज्यात कॅमेरे आणि सेन्सर्स मावतात.हे तंत्रज्ञान केवळ लष्करी हेरगिरीसाठी नाही तर इतर विविध उद्देशांसाठी देखील उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, भूकंपानंतर किंवा मोठ्या अपघातानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे भविष्याच्या युद्धतंत्रात झुरळांचा अनोखा सहभाग दिसून येणार आहे.