उमरखेड मतदारसंघातील प्रश्न सभागृहात

13 Mar 2026 21:13:06
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : राज्याच्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न सभागृहात मांडत शासनाचे लक्ष वेधले. पोलिस ठाणे इमारत, सिंचन व्यवस्था, शेतकरी हिताचे प्रश्न तसेच औद्योगिक विकासासाठी विशेष निधीची गरज त्यांनी अधोरेखित केली. आ. वानखेडे यांनी महागाव येथे पोलिस ठाण्याची नवीन इमारत व पोलिसांसाठी निवासी वसाहत उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली. सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांचा अभाव लक्षात घेता नवीन इमारत उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
y13March-Wankhede
 
रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी पीक पाहणी अ‍ॅपवरील नोंदणीची मुदत संपल्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्याचे सांगत त्यांनी शेतकèयांच्या हितासाठी या नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी केली.
 
 
सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ईसापूर डाव्या कालव्याच्या 0 ते 15 किमीपर्यंतच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध झाला असला तरी 16 ते 54 किमीपर्यंतचा कालवा अत्यंत नादुरुस्त असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. या भागातील कालवे दुरुस्ती व बांधकामासाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
यासोबतच वाढत्या उन्हामुळे पैनगंगा नदी कोरडी पडत असल्याने वन्यप्राणी, गुरेढोरे व नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पैनगंगा नदीमध्ये आवश्यक तेवढे पाणी तातडीने सोडण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी शासनाला सुचविले.
 
 
देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी व बोरी या गावांमधील शेतकèयांना कालवे नादुरुस्त असल्यामुळे मागील वर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कालव्यांची तातडीने दुरुस्ती करून योग्य पाणी व्यवस्थापन करण्याची मागणी केली. यामुळे वन्यप्राणी, पाळीव प्राणी तसेच शेतकèयांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी वेळेवर उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
 
 
तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी किमान 1000 कोटींच्या विशेष निधीची तरतूद करावी, अशीही मागणी त्यांनी केली. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन परिसराचा आर्थिक विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0