तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sheetal-lad : विदर्भातील लोककला टिकून राहावी. तसेच लोककलावंतांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या यवतमाळ शाखेच्या वतीने रविवार, 15 मार्च रोजी उत्सव मंगल कार्यालय येथे विदर्भस्तरीय महिला कलावंत गौरव संमेलन आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यवतमाळ येथे होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हा संयोजक शीतल लाड यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, या संमेलनात नकलाकार, शाहीर, भजनकार, कीर्तनकार, कवी, गायक, भारूडकार, नाट्यकलावंत आदी विविध लोककला क्षेत्रांतील कलाकार सहभागी होणार आहेत.
सकाळी 9 वाजता शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले नाट्यगृह, संविधान चौक, दत्त चौक ते उत्सव मंगल कार्यालय असा कलावंतांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विविध कलावंतांकडून कला सादरीकरण होईल. दुपारी 3 ते 4.30 या वेळेत महिला कलावंतांचा गौरव सोहळा पार पडणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री मदन येरावार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा. कलावंत न्याय हक्क समिती, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकर असतील. विशेष उपस्थिती म्हणून पालकमंत्री संजय राठोड, नगरसेवक रेखा कोठेकर, सीमा बिरादे तसेच विपुल खंडेलवाल उपस्थित राहणार आहेत.
समारोपाला अध्यक्ष म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित राहतील. तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, जिप पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, नगरसेवक शैला मिर्झापुरे व डॉ. अंजली गवार्ले यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पत्रपरिषदेला जिल्हा सहसंयोजक कविता भोयर, जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड, जिल्हा संघटक अशोक अमरकर व संयोजक संतोष डोंगे व इतर सभासद उपस्थित होते. आयोजकांनी विदर्भातील महिला कलावंतांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.