वन्यजीव विषयक परवानगी नाकारणे, हीच आमची मागणी

13 Mar 2026 20:10:43
चंद्रपूर, 
silent-satyagraha-and-peace-day : लोहारडोंगरी प्रकल्पाच्या संदर्भात पुढील कार्यवाहीला तुर्तास स्थगिती देण्यात येत असल्याचे प्रशासनाचे पत्र आम्हाला मिळाले. मात्र, आमची मागणी प्रकल्प रद्द करा अशी नाही. कारण प्रकल्पाला अद्याप मंजुरीच नाही. हा प्रकल्प प्रस्तावित आहे. आमची मुळ मागणी या प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने दिलेली वन्यजीव विषयक परवानगी नाकारणे, ही आहे. या मागणीबाबत पत्रात काहीच नमूद नसल्याने आम्ही उपोषण कायम ठेवू. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्री यांच्या दौर्‍यात कुठलेही निदर्शने करणार नाही. ‘मौन सत्याग्रह’ व ‘शांती दिवस’ पाळू, अशी माहिती यांनी दिली.
 
 
jlk
 
उपोषणकर्ते बंडू धोतरे यांनी आंदोलनस्थळी गुरूवारी पत्रपरिषद घेतली. त्यावेळी धोतरे यांच्यासह प्रा. योगेश दुधपचारे, किशोर जामदार आदी उपस्थित होते. धोतरे पुढे म्हणाले, लोहारडोंगरी लोह खाण आंदोलन विषयी विधानसभेतसुद्धा प्रश्न झाले. परंतु, मूळ मागणीपासून सारेच लांब असल्याचे दिसते. या आंदोलनाची मुख्य मागणी ही आहे की, ताडोबाच्या महत्वपूर्ण भ्रमणमार्गातील प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करावी.
 
 
उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रकृतीच्या कारणाने पोलिस विभागाकडून धोतरे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तसेच आठव्या दिवशी परत शुगर कमी व युरीन मधील कीटोन बॉडीज वाढल्याने त्यांना भरती करण्यात आले. या दोन्ही वेळेस वैद्यकीय उपचार घेऊन रुग्णालयातून परतल्यानंतरही त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवण्यात आले.
 
मागणीविषयी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा
 
 
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, शासनाकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पत्रात नमूद करण्यात आले की, ‘राज्य वन्यजीव मंडळाच्या 6 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीत उक्त खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारशी करण्यात आल्या आहेत. तथापि, या प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यास तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे.’ मात्र, ‘तूर्तास स्थगिती’ असे आश्वासन असू शकत नाही. ‘लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस, परवानगी नाकारण्यात यावी’ या मागणीनुसार पत्रात उल्लेख असावा, अशी मागणी आम्ही या चर्चेत केली, असेही धोतरे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0