‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’चा दिमाखदार सोहळा

डॉ. जब्बार पटेल यांना जीवनगौरव

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
मुंबई 
Zee Chitra Gaurav Puraskar 2026, मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2026’ यंदा नव्या जोमाने आणि मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. “मराठी गाजलंच पाहिजे” या घोषवाक्यासह साजरा होणाऱ्या या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. झी चित्रगौरवच्या मंचावर मराठीचा अभिमान दुमदुमणार असून, मराठीचा हुंकार घुमणार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.
 

Zee Chitra Gaurav Puraskar 2026 
यंदाच्या झी चित्रगौरव २०२६ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरेल ते म्हणजे जेष्ठ दिग्दर्शक ‘डॉ. जब्बार पटेल’, कला ही केवळ करमणूक नसते, ती विचारांची धगधगती मशाल असते हे आपल्या प्रत्येक कलाकृतीतून ज्यांनी नेहमी सिध्द केलं, असं आभाळा एवढं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. जब्बार पटेल. पेशाने डॉक्टर असलेल्या पटेल यांनी आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली. मराठी रंगभूमीच्या पवित्र परंपरेतून चित्रपटाच्या विशाल पडद्यापर्यंत त्यांचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर धाडस, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीचा आहे. त्यांनी आपल्या कलाकृतीतून समाजाशी प्रामाणिक संवाद साधत अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न मांडले आणि प्रेक्षकांच्या मनात विचारांची नवी खिडकी उघडली.
 
 
त्यांचा पहिला चित्रपट Zee Chitra Gaurav Puraskar 2026,  सामना याने मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा भक्कम प्रवेश घडवला आणि त्यानंतर सुरू झाला एक वादळी प्रवास. सिंहासन या चित्रपटातून सत्तेच्या पडद्यामागचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले. उंबरठ आणि जैत रे जैत या चित्रपटांमधून स्त्रीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. याशिवाय एक होता विदुषक मधून कलाकाराच्या आयुष्यातील मुखवट्यामागचे वास्तव दाखवले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाद्वारे त्यांनी भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाची कथा जागतिक स्तरावर पोहोचवली. तसेच मुक्ता चित्रपटातून जातिव्यवस्थेबाबत धाडसी भाष्य करत समाजमनाला विचार करायला भाग पाडले.तसेच, यंदा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विशेष पुरस्काराचे मानकरी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ठरले आहेत. जिद्द, अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गिरणगावाच्या संस्कारातून घडलेले चिन्मय मांडलेकर यांनी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी केला. मोरया, झेंडा, हलाल, गांधी गोडसे – एक युद्ध आणि काश्मीर फाइल्स यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातही त्यांनी नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटवला आहे.झी मराठी प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा नसून मराठी संस्कृती, कला आणि प्रतिभेचा उत्सव आहे. या मंचावर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा गौरव होत असताना नव्या पिढीतील कलाकारांनाही प्रेरणा मिळते. यंदाचा सोहळा मराठीच्या अभिमानाचा उत्सव ठरणार असून, मराठीचा हुंकार घुमणार आणि मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान दिमाखात साजरा केला जाणार आहे.