अस्वलाच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलगा जखमी

14 Mar 2026 15:31:44
गोंदिया, 
bear attack वडिलांसोबत जंगलात मोहफुल वेचण्याकरिता गेलेल्या मुलावर अस्वलाने अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी १४ मार्च रोजी देवरी तालुक्यातील मसुरभावडा येथील जंगल शिवारात सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आयुष रवी शहारे (१५) रा. मसुरभावडा असे जखमी मुलाचे नाव आहे.
 
 
अस्वलाच्या हल्ल्यात
 
 
सद्या मोहफुल वेचणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून, गावातील अनेक नागरिक मोहफुल गोळा करण्यासाठी शेती व जंगल शिवरात जात असतात. त्यातच देवरी तालुक्यातील जेठभावडा गटग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या मसूरभावडा येथील रवी शहारे हे शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगल परिसरात मोहफुल वेचण्याकरीता गेले, यावेळी त्यांचा मुलगा आयुष हा देखील त्यांच्यासह मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दोघेही मोहफूल वेचत असताना झुडपात असलेल्या अस्वलाने आयुषच्या मागून येत अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आयुष गंभीर जखमी झाला. यावेळी वडिलांनी प्रसंगावधान राखत काठीचा आधार घेत मोठ्या हिमतीने अस्वलाच्या तावडीतून आयुषला सोडविले. अस्वलाने आयुषच्या कमरेखाली दोन ठिकाणी चावा घेतला. मात्र, वडील सोबत असल्याने तो बचावला. दरम्यान, आयुषवर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.bear attack या घटनेमुळे परिसरात आस्वलीची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तात्काळ जखमी आयुषच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी व सदर अस्वलीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वन विभागाचे आवाहन ...
सद्या मोहफुल वेचणीचा हंगाम सुरु झाल्याने मोहफुल वेचण्याकरिता अनेकजण जंगलाच्या दिशेने जात असतात. तेव्हा गावकर्‍यांनी शक्यतो मोहफूल वेचण्यासाठी एकटे जाणे टाळावे, व मोहफूलांकरीता जंगल परिसरात कुठेही पाला पाचोळा जाळू नये, असे आवाहन देवरी वन विभागाकडून करण्यात आले आहे.
...
Powered By Sangraha 9.0