अविश्वासाचा निरर्थक प्रयोग

14 Mar 2026 09:38:26
दिल्ली अग्रलेख
om birla विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध मांडलेला अविश्वास प्रस्ताव अपेक्षेप्रमाणे फेटाळला गेला. अविश्वास प्रस्ताव फेटाळला जाणार याची विरोधी पक्षांना कल्पना नव्हती, असे नाही. पण हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची खोड विरोधी पक्षांना जडली असेल तर त्याला कोण काय करणार? ओम बिर्ला यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अनावश्यक तसेच खोडसाळपणाचा होता. त्याची काहीही गरज नव्हती. पण विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसच्या सदस्यांनी बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करीत आपले हसे करून घेतले, असे या प्रस्तावावर झालेली भाषणे ऐकून वाटायला लागले.
 

om birla 
 
 
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या अनेक सदस्यांनी आपल्या घणाघाती भाषणात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे वाभाडे काढले. कुठून आपण बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास आणला, असे चेहरे राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस सदस्यांचे झाले होते. किरेन रिजिजू आणि अमित शाह यांनी काँग्रेसचे पुरते वस्त्रहरण करून टाकले. अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी बिर्ला यांचे लोकसभेतील सर्वच सदस्यांशी, विशेषत: विरोधी पक्षांच्या सदस्यांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा निर्वाळा दिला. एकप्रकारे काँग्रेसच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर करताना सभापती म्हणून बिर्ला यांच्याविरुद्ध जे आरोप केले, त्यांची हवा परस्पर काढून टाकली गेली.
लोकसभेच्या कामकाजाचे संचालन करणे, ही सभापती म्हणून बिर्ला यांची जबाबदारी आहे. लोकसभेच्या कामकाजाचे संचालन बिर्ला यांना मनमानी पद्धतीने करता येत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे संचालन करण्याचे नियम आणि परंपरा आहेत. काही पायंडे- संकेत आहेत. त्यानुसारच सभागृहांच्या कामकाजाचे संचालन करावे लागते. सभागृहात गोंधळ घालणाèया सदस्यांना वेळप्रसंगी रागावावे लागते, समज द्यावी लागते. वारंवार सांगूनही सदस्य ऐकत नसतील, घोषणाबाजी करीत असतील, तर नाईलाजाने सभागृहाचे कामकाज स्थगितही करावे लागते. काही वेळा असंसदीय आणि नियमबाह्य वर्तन करणाèया सदस्यांना निलंबितही करावे लागते. निलंबनाचा कालावधी हा त्या सदस्याच्या गोंधळाच्या तीव्रतेवर अवलबूंन असतो. अनेकवेळा विरोधी पक्ष सदस्यांचे सभागृहातील वर्तन पाहून वर्गातील नाठाळ आणि उनाड विद्यार्थ्यांची आठवण येते. वर्गात गोंधळ घालणाèया शालेय विद्यार्थ्यांना गुरुजी छडीने मारू शकतात. महाविद्यालयात गोंधळ घालणाèया विद्यार्थ्यांना शिक्षकांना छडीने मारता येत नाही. ओम बिर्ला यांची स्थिती अनेकदा महाविद्यालयातील शिक्षकासारखी असते. नाईलाजाने त्यांना शाब्दिक मार द्यावा लागतो. विरोधी पक्षांतील उनाड आणि नाठाळ सदस्यांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. राज्यसभेत निवडून येणारे प्रतिनिधी थेट लोकांमधून निवडून येत नसतात, तर अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येत असतात. पण लोकसभेत निवडून येणाèया प्रतिनिधींची स्थिती तशी नसते. दहा ते वीस लाख मतदारांचे प्रतिनिधित्व हे सदस्य करत असतात.om birla लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात आपले प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी जनतेने या लोकांना निवडून दिले असते, पण हे सदस्य ते काम करण्याऐवजी पक्षनेतृत्वाला खुश करण्यासाठी सभागृहात गोंधळ घालत असतात. मात्र, असे वागून आपण आपल्या मतदारसंघातील जनतेची फसवणूक करतो, त्यांचा विश्वासघात करतो, याची जाणीव त्यांना राहत नाही.
 
भाजपा 2014 पासून सत्तेत आहे, त्याआधी प्रदीर्घ काळ या पक्षाला विरोधी बाकांवर बसावे लागले. भाजपाचे सदस्यही विरोधी पक्षांत असताना सभागृहात गोंधळ घालत होते, घोषणाबाजी करत होते. पण आपल्या कृतीने आपल्या मतदारसंघातील जनतेला मान खाली घालावी लागेल, अशी कृती त्यांनी केली नाही. त्या तुलनेत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाचे पार अवमूल्यन करून टाकले आहे. त्यांच्या आधी अनेकांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले, ते त्या पदाची प्रतिष्ठा आणि आब राखून. राहुल गांधी यांची सभागृहातील कृती ही अनेकवेळा अनियंत्रित आणि बेजबाबदारपणाची असते. सभागृहात बसले असताना डोळा मारणे, आपली जागा सोडून सत्ता पक्षाच्या बाजूला जाणे, पंतप्रधानांची गळाभेट घेणे असे पोरकट आणि आचरट चाळे राहुल गांधीच करू शकतात. घटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याचा दुरुपयोग राहुल गांधी यांनी आतापर्यंत जेवढा केला, तेवढा खचीतच दुसèया कोणी केला असेल. त्यांचे सभागृहातील वर्तन आता साèयांना सरावाचे झाले आहे. नको ते बोलून आणि आवाज वाढवून ते स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात खरे; पण त्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांची ओळख असलेले विरोधी पक्षांतील सदस्य आणि राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षातील सदस्यही त्यांना फारशा गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही कोणते पाप केले म्हणून असा नेता आमच्या पदरी पडला, असे त्यांना वाटत असावे. त्याचीच पुढची पायरी म्हणजे पदरी पडले पवित्र झाले, अशी स्वत:ची ते समजूत करून घेत असतील.
 
मला सभागृहात बोलू दिले जात नाही, असे रडगाणे राहुल गांधी अखंड गात असतात. पण आपल्याला बोलू का दिले जात नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची मात्र त्यांची तयारी नसते. असे आत्मपरीक्षण केले असते, तर आपल्या प्रश्नाचे उत्तरही त्यांना सहजपणे मिळाले असते. आतापर्यंत अनेक मान्यवरांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले, पण त्यांच्यावर कधीच असे रडगाणे गाण्याची वेळ आली नाही. मला सभागृहात बोलण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणत असतात. याचा अर्थ असा की, पाचव्यांदा लोकसभेत निवडून आल्यानंतरही राहुल गांधींना संसदीय नियम काय असतात, लोकसभेचे कामकाज कसे चालते, हे समजलेले नाही. लोकसभेत कामकाज संचालनाचे सर्वोच्च अधिकार लोकसभेच्या सभापतींचे असतात. संसदभवन परिसराचा राजाही लोकसभेचा सभापतीच असतो. त्यांनी परवानगी दिली नाही तर विरोधी पक्षनेताच काय, पण सभागृहाचे नेते असलेले पंतप्रधानही बोलू शकत नाहीत, एवढे सामान्य ज्ञान विरोधी पक्ष नेते असलेल्या राहुल गांधींना असायला पाहिजे. त्यामुळेच राहुल गांधींना संसदीय नियम शिकविण्याची आवश्यकता असल्याचे भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, जे अतिशय योग्य म्हणावे लागेल.om birla अजूनही वेळ गेली नाही, राहुल गांधी यांनी संसदीय नियमांची बाराखडी शिकून घ्यावी. संसदेचे ग्रंथालय पालथे घालून जुन्या काळचे विरोधी पक्षनेते कसे आणि काय बोलत होते, याचे वाचन करावे. अर्थात, त्यासाठी त्यांना सवड मिळायला हवी. कारण अनेकदा ते भारतात काही महत्त्वाचे सुरू असताना विदेशात असतात. आपल्या काँग्रेस पक्षातही राहुल गांधी स्वतःबद्दल फार चांगली भावना निर्माण करू शकलेले नाहीत. त्यांना काँग्रेसजन ऐकतात, कारण ते गांधी आहेत. ते सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. त्या घराण्याचे नसते तर राहुल गांधी इथवर देखील आले नसते. राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका वढेरा या जास्त चांगल्या विरोधी पक्षनेत्या ठरल्या असत्या, असे किरेन रिजिजू यांनी उपरोधाने म्हटले असले तरी ते सत्य बोलून गेले आहेत. राहुल गांधींना सद्बद्धी यावी, अशी प्रार्थना काँग्रेसचे सदस्य दिवसरात्र करत असतील, आपणही त्यात सहभागी व्हायला हरकत नाही. कारण राहुल गांधींना ज्या दिवशी सद्बुद्धी येईल, तो दिवस काँग्रेस पक्षासाठी लाखमोलाचा ठरणार आहे. संसदीय लोकशाहीच्या चांगल्या भविष्यासाठी राज्यकर्ते कर्तबगार हवेत, तसेच विरोधी पक्षनेता हा अतिशय बुद्धिमान व संयमी असला पाहिजे. अविश्वास प्रस्तावाच्या निरर्थक प्रयोगातून काँग्रेसने स्वतःचे हसे करून घेतले. राहुल गांधींचे त्याहून जास्त हसे झाले, हे त्यांना काँग्रेसजनांनी कधी तरी सांगितले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0