मुंबई
Anil Kapoor बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी ‘धुरंधर २’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटाबाबत अभिनेता अनिल कपूर यांनी अलीकडेच एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘धुरंधर २’मध्ये छोटेखानी कॅमिओ भूमिका करण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती; मात्र व्यावसायिक बांधिलकीमुळे त्यांना ती नाकारावी लागली, असे त्यांनी सांगितले.
एका मुलाखतीत बोलताना अनिल कपूर यांनी सांगितले की, दिग्दर्शक आदित्य धर यांनी त्यांच्याशी संपर्क साधून चित्रपटात छोट्या भूमिकेची ऑफर दिली होती. “मला त्या भूमिकेबद्दल खूप आनंद झाला होता. मात्र त्या काळात मी आधीच दुसऱ्या एका चित्रपटाच्या कामात गुंतलेलो होतो. आज मी जे काही आहे ते माझ्या व्यावसायिक वृत्तीमुळे आणि दिलेल्या शब्दाला पाळण्याच्या सवयीमुळे आहे. केवळ प्रतिभा पुरेशी नसते, व्यावसायिक प्रामाणिकपणा देखील तितकाच महत्त्वाचा असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल कपूर Anil Kapoor पुढे म्हणाले की, त्यांना ‘धुरंधर २’मधील कॅमिओ भूमिका करण्याची इच्छा होती. मात्र आधीच एका निर्मात्यासोबत केलेली बांधिलकी मोडणे योग्य ठरणार नव्हते. “मी आदित्यला सांगितले होते की मला ही भूमिका करायला आवडेल, पण मी आधीच दुसऱ्या प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे. तो चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. मला ही संधी सोडावी लागली याची खंत आहे, पण दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.चित्रपटाचे काम सुरू असताना दुसरा प्रकल्प स्वीकारणे किंवा चालू प्रकल्प सोडणे हे अनप्रोफेशनल ठरले असते, असेही अनिल कपूर यांनी नमूद केले. भविष्यात ‘धुरंधर’ मालिकेच्या तिसऱ्या भागात काम करण्याची संधी मिळाल्यास काय कराल, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी “मी काहीतरी नवीन करेन,” असे सूचक उत्तर दिले.दरम्यान, ‘धुरंधर २’मध्ये रणवीर सिंगसह अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आदित्य धर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.अनिल कपूर अलीकडेच ‘सुभेदार’ या चित्रपटात झळकले होते. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या चित्रपटात राधिका मदन आणि खुशबू सुंदर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.