वाचन संस्कृतीच्या जतनासाठी ग्रंथ चळवळ महत्त्वाची : पांगुळ

14 Mar 2026 20:45:19
वर्धा
Wardha डिजीटल युगाच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. यासाठी ग्रंथ चळवळ उभी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कुठल्याही कार्यक्रमात जाताना पुस्तकं, ग्रंथाची भेट दिली पाहिजे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथ वाचनाची गोडी निर्माण होऊन ग्रंथ चळवळीला दिशा मिळेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने बजाज सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा उद्घाटन प्रसंगी आज १४ रोजी सुधीर पांगुळ बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष मिलींद जुनगडे, बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजेंद्र मुंढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, सुधीर गवळी आदी उपस्थित होते.
 
wardha vachan photo 
यावेळी डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालय चळवळ जीवंत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ही चळवळ कायम ठेवण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रंथालयांचे अनुदान, कर्मचार्‍यांचे वेतन व अन्य समस्या यावर कोटेवार यांनी भाष्य केले.
Wardha ग्रंथ मनुष्याला दिशा देण्याचे काम करण्यासोबतच मानवी मुल्य जोपासण्याचे काम ग्रंथाच्या माध्यमातून होत आहे. यासाठी थोर संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रत्येकांनी वाचन करावे, असे संजय इंगळे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप बजाज, मिलींद जुनगडे यांनी सुद्धा मनोगत व्यत केले. प्रस्ताविक नितीन सोनोने यांनी केले.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवात रसिकांना सारं गाव मामाचं एकपात्री प्रयोग, गझल, मुशायरा, मराठी भाषेवर परिसंवाद, कवी संमेलन यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह ग्रंथोत्सवात लावण्यात आलेल्या बुक स्टॉलला भेट देऊन पुस्तके खरेदी करावे, असे आवाहन केले. यावेळी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. संचालन जगदीश भगत यांनी केले तर आभार सुधीर गवळी यांनी मानले.
Wardha लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. गजानन कोटेवार यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून दिंडीचा आरंभ झाला. ग्रंथदिंडीचा समारोप सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय सभागृहात झाला. ग्रंथदिंडीत म्युनिसिपल कमला नेहरू हायस्कूल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, जगजीवनराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोक विद्यालय, रत्नीबाई विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आणि ग्रंथांची महती सांगणारे गीतगायन, नृत्य, नाटिका व मनोगते सादर केली. या कार्यक्रमाचे संचालन हर्षा उईके यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0