गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा

14 Mar 2026 18:51:48
कारंजा लाड, 
gas cylinder shortage,आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला असल्याने कारंजा तालुक्यात शहरासह कामारगाव, धनज व इतर ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस सिलेंडरचा ट्रक न आल्याने स्थानिक गॅस एजन्सीकडे बुकिंग केलेल्या ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना एजन्सीच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

gas cylinder shortage, 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीकडे सध्या गॅस सिलेंडरची प्रतीक्षा यादी झपाट्याने वाढत असून, अनेक जन वेटिंगवर असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक पोहोचत नसल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू असून, अनेक जण एजन्सीकडे गर्दी करत आहेत. दरम्यान अनेक ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग करण्याचा पर्याय स्विकारला असला तरी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था देखील बंद पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सिलेंडर कधी मिळणार याबाबत ग्राहकांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांमध्ये गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे. वेळेत सिलेंडर उपलब्ध न झाल्यास काही ठिकाणी लग्न समारंभ पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून गॅस सिलेंडरचा ट्रक न आल्याने अनेक ग्राहकांना पुरवठा करता आला नाही. त्यामुळे बुकिंग वेटिंगवर आहेत. दरम्यान, नागरिकांनी प्रशासन व संबंधित गॅस वितरण यंत्रणेने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
 
 
ग्राहकांनी सिलेंडर संदर्भात घाबरून जाऊ नये
 
 
कारंजा शहरातील गॅस एजन्सीची तपासणी केली असता दोन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे आढळून आले. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे या संदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच ग्राहकांनी सिलेंडर साठी गर्दी करू नये.
स्मिता नायगावकर
तालुका पुरवठा अधिकारी कारंजा
Powered By Sangraha 9.0