मुंबई,
LPG gas shortage इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून एलपीजी गॅसच्या तुटवड्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस बुकिंग आणि सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक एजन्सीबाहेर तासन्तास उभे राहावे लागत आहेत. या गंभीर परिस्थितीचा फायदा काही सायबर भामट्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. गॅस टंचाईमुळे नागरिक आधीच असुरक्षित असतानाच सायबर ठग नागरिकांना गॅस कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन फसवणूक करत आहेत.
माहितीनुसार, मुंबईतील सायबर फसवणूक करणाऱ्या गटाने चार दिवसांत एकूण 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा केला आहे. सायबर भामटे महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन करतात आणि बिल थकले असल्यास कनेक्शन कापले जाईल अशी धमकी देतात. नंतर कनेक्शन वाचवण्यासाठी 10–20 रुपये भरण्यास सांगितले जाते आणि ‘mahanagar apk’ नावाची फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. या फाईलवर क्लिक करताच ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम उडवण्यात येते.गेल्या चार दिवसात विले पार्ले, वडाळा अशा भागातून अनेक सायबर फसवणूकच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक नागरिक गॅसच्या तुटवड्यामुळे आधीच त्रस्त आहेत, त्याचा फायदा सायबर गँग घेत आहे. हे ठग सर्वसामान्य नागरिकांना निशाणा बनवत त्यांच्या मेहनतीचा पैसा चोरतात आणि बँक खात्यावर थेट हल्ला करतात.
दरम्यान, LPG gas shortage महानगर गॅसने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की ग्राहकांनी कोणतीही लिंक डाऊनलोड करू नये आणि अधिकृत क्रमांकावरच संपर्क साधावा. तसेच कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम किंवा पैसे मागितले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.