मी दाऊदच्या बहिणींचा बॉडीगार्ड होतो

नाट्यनिर्माते अशोक शिगवण यांचा धक्कादायक प्रवास उघड

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
मुंबई
Dramatist Ashok Shigwan मुंबईतील गुन्हेगारी विश्वाशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांबाबत नाट्यनिर्माते अशोक शिगवण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एकेकाळी अंडरवर्ल्डच्या वातावरणात वावरणारे शिगवण आज मराठी रंगभूमीवरील ओळखले जाणारे नाव बनले असले, तरी त्यांच्या आयुष्यातील त्या काळातील अनुभव त्यांनी प्रथमच इतक्या स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सामाजिक माध्यमांवर आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.
 

Old ties with the underworld Dramatist Ashok Shigwan revelation 
एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना शिगवण यांनी मुंबईतील गिरणी संप, त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर आलेले आर्थिक संकट आणि त्या परिस्थितीतून गुन्हेगारी जगताकडे वळलेला त्यांचा प्रवास उलगडून सांगितला. “मुंबई कुणाची? माझ्या मते मुंबई ही गिरणी कामगारांची आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या वडिलांचा मुंबईतील ‘न्यू ग्रेट मिल’मध्ये गिरणी कामगार म्हणून रोजगार होता. गिरणीतूनच घरासाठी रेशन मिळत असे. मात्र गिरणी संपानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. कमावणारे एकमेव वडील आणि आई अशिक्षित असल्याने घरावर मोठे संकट ओढवले.
शिगवण सांगतात की, संपानंतर त्यांच्या वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चोरीछुपे गिरणीत काम करावे लागले. त्या काळात असे लपून काम करणाऱ्या कामगारांवर हल्ले होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “इतरांच्या दृष्टीने ते चुकीचे असू शकते, पण कुटुंब चालवण्यासाठी बाबांनी तो निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 कशी झाली ओळख? 
कॉलेजमध्ये असताना Dramatist Ashok Shigwan  त्यांच्या आयुष्यातील एक वळण त्यांनी मुलाखतीत सांगितले. हेमंत नावाच्या मित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख त्याच्या मोठ्या भावाशी झाली. महेंद्र नावाचा तो व्यक्ती त्या काळात अंडरवर्ल्डशी संबंधित होता. त्याच्या घरात येणाऱ्या गँगस्टर्सचे वावरणे, त्यांचे वैभव आणि जीवनशैली पाहून आपण प्रभावित झाल्याचे शिगवण यांनी कबूल केले. सावत्या, अनिल यांसारखे गँगस्टर्स तिथे येत असत आणि त्या वातावरणाने आपण आकर्षित झालो, असेही त्यांनी सांगितले.नंतर महेंद्र पाटील याला टाडा कायद्यांतर्गत अटक होऊन त्याची नाशिक कारागृहात रवानगी झाली. त्या काळात त्याला मुंबईहून रोज मोठा डबा पाठवला जात असे. “तो डबा नाशिकला नेण्याचे काम मी करत होतो. त्या डब्यात दहा-बारा लोक जेवतील इतके अन्न असायचे,” अशी आठवण शिगवण यांनी सांगितली.या काळातच त्यांचा संबंध अंडरवर्ल्डमधील आणखी एका घटनेशी आला. महेंद्र सुटून आल्यानंतर त्यांना एका कामाची जबाबदारी देण्यात आली. दाऊद इब्राहिमच्या लहान बहिणी मुमताजसोबत बॉडीगार्ड म्हणून राहण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
त्या काळात दिवसाला ५०० रुपये मानधन मिळत असे. “माझ्यासोबत आणखी दोन जण होते. मुमताज शॉपिंगला किंवा इतर ठिकाणी गेली की आम्ही तिच्यासोबत असायचो. जवळपास तीन महिने मी तिचा बॉडीगार्ड होतो,” असे त्यांनी सांगितले.या काळात आपण दाऊद इब्राहिमला कधीच भेटलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ज्या इमारतीत आम्ही राहायचो त्यात एक मजला दाऊदचा होता. मी अनेकदा वर गेलो आहे, तिथला चहा देखील प्यायलो आहे; पण दाऊदशी प्रत्यक्ष भेट झाली नाही,” असे ते म्हणाले.त्या काळात आपले लक्ष फक्त कुटुंबाला आर्थिक मदत करण्याकडे होते, असे सांगत शिगवण म्हणाले की, “आई-वडिलांना पैसे द्यायचे हेच माझ्या डोक्यात होते. मी गँगस्टर्सच्या वातावरणात आहे याची जाणीव होती; पण पुढे काय होईल याची कल्पना नव्हती.”गुन्हेगारी विश्वातील त्या टप्प्यानंतर त्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे बदलले आणि मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. आज ते मराठी रंगभूमीवरील यशस्वी नाट्यनिर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यातील या अनपेक्षित प्रवासामुळे सध्या त्यांच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा होत आहे.