नवी दिल्ली,
heat stroke उन्हाळा सुरू होताच वाढत्या तापमानाचा परिणाम थेट आपल्या शरीरावर दिसू लागतो. अनेकांना थकवा, डोकेदुखी किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवतात. अनेकदा हे लक्षणे सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात, मात्र तज्ज्ञांच्या मते ही शरीराने दिलेली उष्णतेची धोक्याची सूचना असू शकते. योग्य वेळी काळजी न घेतल्यास डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
उन्हाळ्यात शरीरात दिसणारी ही काही महत्त्वाची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे आहे.
1. सतत थकवा आणि अशक्तपणा
उष्णतेमुळे शरीरातून घामावाटे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि काम करण्याची ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू शकते.
2. लघवीचा रंग गडद होणे
लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असल्यास शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे संकेत मिळतात. हे किडनीवर ताण येण्याचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे अशा वेळी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक असते.
3. चक्कर येणे किंवा डोकेदुखी
उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे चक्कर येणे, डोके जड वाटणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे असे त्रास होऊ शकतात. हे Heat Stroke चे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
4. स्नायूंमध्ये गोळे येणे
अति उष्णतेमुळे घामासोबत शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम कमी होतात. त्यामुळे हात-पायांच्या स्नायूंमध्ये कळा किंवा गोळे येण्याची समस्या निर्माण होते. अशा वेळी विश्रांती घेणे आणि ओआरएससारखे द्रवपदार्थ घेणे उपयुक्त ठरते.
5. त्वचा कोरडी पडणे किंवा रॅशेस
उन्हामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे किंवा घामोळ्या येणे अशा समस्या दिसू शकतात. त्वचा खूप गरम वाटणे पण घाम न येणे हे गंभीर उष्माघाताचे लक्षण मानले जाते.
उन्हाळ्यात घ्या ही काळजी
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात काही साध्या सवयी अंगीकारल्यास या समस्यांपासून बचाव करता येतो.
- दिवसातून किमान ३–४ लिटर पाणी प्या
- आहारात लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये घ्या
- काकडी, टरबूज यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा
- शक्यतो सुटे आणि सुती कपडे परिधान करा
उन्हाळ्यात शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेत योग्य काळजी घेतल्यास उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करता येते.