‘बिग बॉस मराठी ६’मध्ये राखी–संकेतचे ‘फेक भांडण’ चर्चेत

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
मुंबई
Bigg Boss Marathi 6 ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये दररोज नव्या घडामोडी पाहायला मिळत असून घरातील स्पर्धकांच्या रणनीती आणि वादामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होत आहे. विशेषतः वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतच्या प्रवेशानंतर घरातील वातावरण अधिकच बदलले असून तिच्या कृतींमुळे अनेकदा घरात वाद निर्माण होताना दिसत आहेत.
 
 
Bigg Boss Marathi 6
अलीकडेच घरात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कनंतर राखी सावंत आणि संकेत पाठक यांच्यात झालेल्या कथित ‘फेक भांडणाची’ चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. या दोघांनी मुद्दाम भांडण करण्याचा प्लॅन केल्याची एक क्लिप व्हायरल झाली असून त्यामुळे ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड असतो का, हा प्रश्न पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत हा शो स्क्रिप्टेड नसल्याचे सांगितले. “हा बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड नाही. इथे स्क्रिप्टेड गोष्टी करू नका,” असे त्यांनी स्पर्धकांना स्पष्टपणे सांगितले. संकेत आणि राखी यांच्यातील संभाषणामुळे निर्माण झालेला गोंधळ हा स्पर्धकांच्या नैसर्गिक प्रतिक्रियांमुळे झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
रितेश देशमुख यांनी स्पर्धकांना सूचना देताना काही वेळा अ‍ॅक्टिंग करणे, राग व्यक्त करणे किंवा पाणी फेकण्यासारख्या कृती दिसल्या तरी हा ‘राखी सावंत शो’ नसल्याचेही ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण काही काळ गंभीर झाले.
 
 
यानंतर राखी सावंतला तिची चूक उमगल्याचे दिसून आले. ती तात्काळ उभी राहून कान पकडत रितेश देशमुख यांची माफी मागताना दिसली. मात्र तिच्या नेहमीच्या शैलीमुळे ती पूर्णपणे शांत राहिली नाही. शेवटी रितेश देशमुख यांनी “एक मिनिट राखी…” असे म्हणत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकून न घेतल्याने प्रोमोमध्ये रितेश देशमुख “I Am Done” असे म्हणत हात वर करत ‘भाऊच्या धक्क्याला’ थांबवताना दिसले, हा क्षण प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, संकेत पाठक आणि राखी सावंत यांच्यातील हा प्रसंग सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. काही प्रेक्षकांनी या घटनेकडे गैरसमज म्हणून पाहिले आहे, तर काहींच्या मते हा गेममधील एक रणनीतीपूर्ण क्षण असू शकतो. बिग बॉसच्या घरात परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देणे आणि नातेसंबंधांचा वापर करून खेळ पुढे नेणे हीदेखील स्पर्धकांच्या गेम स्ट्रॅटेजीचा भाग असतो, असेही काहींचे मत आहे.
सध्या घरात ‘टोळी’ आणि ‘काटा’ अशा गटांची चर्चा सुरू असून वाइल्ड कार्ड स्पर्धकांच्या आगमनानंतर घरातील समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे दिसत आहे. गेम जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे सदस्यांच्या रणनीती, नातेसंबंध आणि मतभेद अधिक स्पष्ट होत आहेत. त्यामुळे संकेत आणि राखी यांच्यातील हा प्रसंग केवळ वाद होता की खेळातील एक स्मार्ट डावपेच, याबाबत प्रेक्षकांमध्ये वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत.