बायोगॅसमुळे कारागृहात वाचतील 9125 सिलिंडर!

15 Mar 2026 14:15:34
अनिल फेकरीकर,
नागपूर, 
biogas-will-save-cylinders-in-prisons : अमेरिका - इस्त्रायल- इराणचे युद्ध भारतावर एलपीजी तुटवड्याच्या रूपाने ओढवले आहे. अशा संकट समयी एक विशिष्ट संधीही सोबत आली आहे. त्याच संधीचा वापर करून आपण एलपीजीला पर्याय म्हणून बायोगॅसचे प्रकल्प वाढविल्यास मोठ्या प्रमाणात इंधन तयार होऊ शकते. हो, त्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात बायोगॅसचा प्रकल्प उभारल्यास आपण सुमारे 9125 सिलेंडरची बचत एका वर्षात करू शकतो. अशा स्वरूपातील अभिनव प्रस्ताव तत्कालीन पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार आज त्याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. समजा बायोगॅसचा प्रकल्प यशस्वी ठरल्यास संपूर्ण देशापुढे तो एक आदर्श प्रयोग ठरेल. बायोगॅस विविध वायूंचे मिश्रण असते. यात मिथेन, कार्बन डायऑक्साईड असतो. मिथेन हा ज्वलनशील वायू असल्याने त्या बायोगॅसचा वापर स्वयंपाकासह वीज निर्मितीसाठी इंधन म्हणून केला जातो. परिणामी एलपीजी सिलिंडरची बचत होऊन खर्चही कमी होतो.
 
 
 

PRISON 
 
 
 
गोधनाचे शेण किंवा मानवी विष्ठा, खरकटे अन्न, भाजीपाल्याचा कचरा, शेतीतील पिकांचे अवशेष यांचा वापर करून बायोगॅस तयार होतो. भारत सरकारच्या वतीने याकरिता अनुदान दिले जाते. आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून अस्तित्वात आलेले बायोगॅस यशस्वी आणि फलदायी ठरले आहेत. याचा यशस्वी प्रयोग पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी गावात गेल्या 6 वर्षांपासून सुरू आहे.
 
 
मध्यवर्ती कारागृहात जवळपास 3 हजार कैदी आणि 450 कर्मचारी कार्यरत आहेत. जागाही भरपूर आहे. त्याचा विचार करता येथील मानवी विष्ठेचा वापर बायोगॅस प्रकल्पासाठी झाला तर मोठ्या प्रमाणात इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल. आज आधुनिक बायोगॅस सयंत्र उपलब्ध आहेत. त्यांची हाताळणी यंत्राच्या मदतीने करता येते. यामुळे कुणालाही त्याचा त्रास होणार नाही. शिवाय त्यातून निघणाèया खताचा वापर येथील शेतात करता येईल. किंवा ते महागडे जैविक खत विकून शासकीय तिजोरी भरता येईल. आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष झाले पण आज इराणच्या युद्धामुळे सर्वजण सिलिंडरच्या टंचाईवर बोलत आहेत.
 
 
पण बायोगॅस हा सर्वोत्तम आणि लाभदायक पर्याय असल्याचे सांगायला बहुतांश मंडळी विसरले आहेत. तेव्हा शासनाने यासंदर्भात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहात बायोगॅसची निर्मिती करावी. शेवटी संधी ही सुटाबूटात नव्हे तर मळलेल्या कपड्यातच येत असते. तेच शाश्वत सत्य मानून यावर कार्य केल्यास काही प्रमाणात का असेना भारत इंधनाच्या संदर्भात आत्मनिर्भर होईल, हे मात्र नक्की.
 
 
दररोज होतात 22 हजार पोळ्या
 
 
मध्यवर्ती कारागृहात वर्तमानात 2700 पेक्षा जास्त कैदी बंदीस्त आहेत. या कैद्यांसाठी दररोज दोन्ही वेळच्या मिळून 22 हजार पोळ्या हाताने तयार केल्या जातात. याकरिता सिलिंडरची गरज भासते. कारागृहात दररोज 600 किलो भाजी लागते. वर्तमानात सिलिंडरची टंचाई पाहता लाकडांच्या चुली पेटवून आम्ही भाजी शिजवत आहोत, अशी माहिती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी दिली. कारागृहात दररोज 25 सिलिंडर लागतात. त्यानुसार एका वर्षात 9125 सिलिंडर लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होणाèया सिलिंडरची बचत समजा बायोगॅसमुळे झाली तर आम्हाला आनंदच होईल, नव्हे ती आमच्या हातून देशसेवा घडेल, अशी भूमिका अधीक्षक वैभव आगे यांनी मांडली.
Powered By Sangraha 9.0