मुंबई
Dhurandhar 2 अभिनेता रणवीर सिंग, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असला तरी प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील एका दृश्यामुळे शीख समुदायाने तीव्र आक्षेप घेतला असून हा चित्रपट शीख समुदायाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विकी थॉमस सिंग यांनी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक तसेच चित्रपटात शीख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता रणवीर सिंग यांच्याविरुद्ध केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे कायदेशीर नोटीस दाखल केली आहे. या नोटीसमध्ये शीख धर्मातील परंपरा आणि धार्मिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नोटीसनुसार, शीख धर्मात तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे चित्रपटात शीख व्यक्तिरेखा धूम्रपान करताना दाखवणे केवळ धार्मिकदृष्ट्या असंवेदनशील नसून संपूर्ण शीख समुदायाच्या श्रद्धांचा अपमान करणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, विकी थॉमस सिंग Dhurandhar 2 यांनी चित्रपटातून शिखांना धूम्रपान करताना दाखवणारी सर्व दृश्ये तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. तसेच चित्रपटाशी संबंधित पोस्टर्स, ट्रेलर आणि इतर प्रचारात्मक साहित्यातील अशा दृश्यांनाही काढून टाकावे, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटातील निंदनीय, आक्षेपार्ह आणि धार्मिकदृष्ट्या असंवेदनशील मजकूर तातडीने काढून टाकावा आणि शीख समुदायाची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कारण चित्रपटातील काही दृश्ये आणि प्रचारात्मक साहित्यामुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.या चित्रपटात रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी या काल्पनिक भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. कथानकानुसार, हा गुप्तहेर ‘हमजा अली’ या नावाने पाकिस्तानच्या शत्रू सैन्यात राहून भारतासाठी गुप्त माहिती पुरवतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात जसकीरत सिंग रंगीला प्रशिक्षित असूनही पाकिस्तानात पाठवण्यात आलेला कैदी म्हणून दाखवण्यात आले होते. तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागात त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते आणि गुप्त कारवायांचे पैलू उलगडणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘धुरंधर’ मालिकेतील कथानक कंधार विमान अपहरण, २००१ मधील संसदेवरील हल्ला आणि २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला यांसारख्या महत्त्वाच्या भू-राजकीय आणि दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या घटनांशी संबंधित गुप्तचर कारवायांचे नाट्यमय चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि बी६२ स्टुडिओज निर्मित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्च रोजी हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू १८ मार्च रोजी ठेवण्यात आला असून, प्रदर्शनापूर्वीच निर्माण झालेल्या या वादामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष अधिक वेधले गेले आहे.