डीजे धुमाल वाहनाचा अपघात; १ ठार, १४ जखमी

15 Mar 2026 21:19:18
खरांगणा (मो.), 
dj-dhumal-vehicle-accident : आर्वीकडे जाणार्‍या मालवाहू वाहनाने समोरून येणार्‍या डीजे धुमाल बॅण्ड पार्टीच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात मालवाहू वाहनाचा चालक मिलिंद उर्फ मिलन एकापुरे (२५) रा. सुकळी-भादोड हा ठार झाला तर १४ जण जखमी झाले. हा अपघात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास वर्धा—आर्वी मार्गावरील खरांगणा (मो.) परिसरात झाला.
 
 

k 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद एकापुरे खरांगणा येथुन एम.एच. ४० एन. २६३८ क्रमांकाचा मालवाहूने आर्वीकडे जात होता तर धुमाल बॅण्ड पार्टीचे एम. एच. ३१ एफ. सी. ५६६६ क्रमांकाचे वाहन आर्वी येथुन वर्धेकडे जात होते. या वाहनात १४ जण होते. हे वाहन जतीन सुहाढोल हा युवक चालवत होता. हे दोन्ही वाहने खरांगणापासून काही अंतरावर असलेल्या घाट मार्गावर आली असता समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
 
 
खरांगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठले. या अपघातात मालवाहूचा चालक मिलिंद एकापुरे याचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी मोहन उईके गंभीर जखमी झाला. तर धुमाल बॅण्ड पार्टीच्या वाहनातील सुन्नू वर्मा, लकी झुनझुनकर, जतीन वाघमारे, प्रज्वल वाघमारे, ऋषिकेश भोसकर, मनीष भोयर, अभय खेकडे, राहुल खेकडे, अभय चौरे, अतिश भोसकर, पवन भोयर, राहुल, योगेश सावरकर, मनीष बिहाडे तसेच चालक जतीन सुहाढोल हाही जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0