ठगबाज भावंडांनी अनेकांना घातला ५१ लाखांचा गंडा

15 Mar 2026 21:51:01
अनिल कांबळे,
नागपूर,
fraudulent-siblings : मद्याचा अर्क तयार करणाऱ्या वाईन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास २० टक्के भरघोस नफा कमावता येतो, असे आमिष दाखवत दोन भावंडांनी अनेकांना ५१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पाचपावली पोलीस हद्दीत घडला.
 
 
ss
 
 
 
अविनाश मदनलाल बुरडे (३४) रा. तांडापेठ, विणकर कॉलनी हे महादेव लोखंडेचे घरी किरायाने राहतात. त्यांची पाचपावली परिसरातील प्रशांत निलकंठ पौनिकर (४०) आणि देवेन्द्र निलकंठ पौनिकर (४४) या दोन भावांशी ओळख झाली. या दोघांपैकी प्रशांतने आपण १० पतो ग्रिन लेबल कंपनीच्या हरदेव ग्रुपमध्ये काम करत असून जनता चौकात ऑफिस असल्याचे सांगितले. मार्च २०२५मध्ये प्रशांत याने अविनाश यांना एक वाईन स्कीम नावाने गुंतवणूक करण्यासाठी संधी असल्याचे सांगितले. यात १ लाख रुपये गुंतवणूकीवर २० टक्के दराने १ लाख २० हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले.
 
 
 
दोन्ही भावांनी सुरूवातीला अविनाश यांना गुंतवणूकीवर एक महिन्यापुरता फायदा मिळवून दिला. अविनाश यांचा विश्वास बसला. त्यांनी ही बाब वस्तीतील ओळखीच्या लोकांना सांगितली. दरम्यान १९ मे २०२५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान या स्कीममध्ये अनेकांनी जवळजवळ ५० लाख ९७ हजार रुपये गुंतवले. त्यावर प्रशांत आणि त्याचा भाऊ देवेंद्रने व्हॉट्सअपवर सर्व गुंतवणूकदारांना पैसे भरल्याचे बनावट चालान आणि पावत्या पाठवल्या.
 
 
गुंतवणूकदारांनी नफ्याची रक्कम मागण्यास सुरूवात केली असता दोन्ही भावांनी कधी मॅनेजरचा अपघात झाला तर कधी मनपा निवडणूक तर कधी अन्य कारणे देत टाळाटाळ केली. गुंतवणूकदार आक्रमक झाल्याने दोन्ही भावांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे सुरू केले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्वांनी पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. चौकशी अंती पोलिसानी फसवणूकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
Powered By Sangraha 9.0