गॅस टंचाईच्या काळातही लहानुजी आश्रमात अखंड अन्नसेवा

15 Mar 2026 21:31:58
आर्वी, 
gas-shortage-lahanuji-ashram : महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शेगाव नंतर स्वच्छता आणि शांतता कुठे पहायला मिळत असेल तर ती नजिकच्या टाकरखेडा येथील संत लहानुजी महाराज देवस्थानात! भव्य परिसरात असलेल्या संत लहानुजी महाराज समाधी स्थळी दर्शन घेणार्‍यांची दररोज मोठी गर्दी असते. येथे विविध उपक्रमही राबवल्या जातात. येणार्‍या भाविक आणि मंदिर परिसरात राहणार्‍या हजारोंकरिता महाप्रसाद केल्या जातो. युद्धजन्य परिस्थिनीने सर्वत्र गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने बोंब मारल्या जात आहे. येथील विश्वस्त मंडळाने १५ वर्षांपूर्वी आजचा विचार करून तयार केलेल्या गोबर गॅसवर आता स्वयंपाक केल्या जातो आहे.
 
 

k 
 
 
 
सध्या देशात गॅसचा तुटवडा जाणवत असताना अनेक ठिकाणी हॉटेल, मेस व खाद्य व्यवसाय अडचणीत आले आहेत. मात्र या परिस्थितीतही संत लहानुजी महाराज संस्थान येथे भाविकांसाठी अन्नसेवा आनंदाने व अखंड सुरू आहे. संस्थानच्या व्यवस्थापनाने जवळपास १५ वर्षांपूर्वी घेतलेला दूरदृष्टीपूर्ण निर्णय आज अत्यंत मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. संस्थानच्या गोशाळेत सध्या सुमारे ५५० गायींचे संगोपन केले जाते. गोशाळेतून दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्‍या शेणाचा योग्य व उपयुत वापर करण्याच्या उद्देशाने संस्थानच्या व्यवस्थापनाने तब्बल १५ वर्षांपूर्वी १०५ घनमीटर क्षमतेचा गोबरगॅस प्रकल्प उभारला होता. त्या वेळी घेतलेल्या या निर्णयाचे महत्त्व आजच्या परिस्थितीत अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या गॅसचा उपयोग करून संस्थानमध्ये दररोज सुमारे १ हजार भाविकांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. देशात गॅस टंचाईची परिस्थिती असतानाही संस्थानची अन्नसेवा कोणताही अडथळा न येता सुरळीतपणे सुरू आहे.
 
 
संस्थानच्या व्यवस्थापनाने घेतलेला हा निर्णय केवळ ऊर्जा निर्मितीपुरता मर्यादित नसून गोसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वयंपूर्ण व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरला आहे. दरम्यान, संस्थानच्या गोसंवर्धन कार्यालाही विविध स्तरांवर गौरव प्राप्त झाला असून नागपूर विभागात प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील भाविक व नागरिकांकडून संस्थानच्या व्यवस्थापनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0