हिंदूराष्ट्राला परमवैभवाला नेण्याची गरज : गोपी चव्हाण

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
gopi-chavan : राष्ट्र ही एक भावात्मक, सांस्कृतिक संकल्पना आहे. ती भौतिक स्वरूपात दिसत नाही. जसा शरीरात आत्मा आहे, तो दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व आहे व तो अनिवार्य आहे. तो गेल्यावर काही राहात नाही. तसेच राष्ट्र हा देशाचा आत्मा आहे, असे असे प्रतिपादन आरंभी येथील विशाल हिंदू संमेलनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धीक प्रमुख गोपी चव्हाण यांनी केले.
 
 
 
y15March-Chavhan
 
 
ते पुढे म्हणाले, जसे इस्रायलवर दोन हजार वर्षांपूर्वी रोमन लोकांचे मोठे आक्रमण झाले व त्या देशातील सर्व ज्यूंना जगातील विविध देशांमध्ये परागंदा व्हावे लागले. भूमी गेली पण ज्यूंच्या अंतकरणातील राष्ट्रभाव त्यांनी तब्बल 2000 वर्षे जिवंत ठेवला व शेवटी असीम इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन्हा 1948 साली आपली भूमी पुन्हा मिळवली.
 
 
 
आज एक अत्यंत स्वाभिमानी, बलवान राष्ट्र म्हणून इस्रायल जगात ताठ मानेने उभे आहे. एखाद्या भूमीवरील लोकसमूहाचं रूपांतर राष्ट्रात होण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर त्या भूमीबद्दलची अत्यंत पूज्य भावना आणि स्वतःबद्दलची पुत्ररूप भावना, पूर्वजांबद्दलचा अभिमान, समान आदर्श, समान संस्कृती, समान शत्रू-मित्र भाव, समान जय पराजय भावना, समान आकांक्षा अशा सर्व निकषांत आपला भारत देश राष्ट्र म्हणून बसतो का, याचा विचार आज आपल्याला करायची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
आपण हिंदू म्हणून या देशामधील चुकीचे समज दूर करून इथल्या प्राचीन राष्ट्राची, एका संस्कृतीची जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. शेवटी पंच परिवर्तनच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा सर्वांनी संकल्प करावा, असेही आवाहन या प्रसंगी गोपी चव्हाण यांनी केले.
संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम महाराज इंगोले व विजय महाराज गव्हाणे यांनी आशीर्वचनामध्ये हिंदू समाजातील समस्या, धर्म, वारकरी संप्रदायदेखील या हिंदू समाजासाठी अविरतपणे झटतो आहे, असे प्रतिपादन केले.
गोमाता, भारतमाता पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रास्ताविक, परिचय करून देत अकोला येथील सुरेश शाहीर यांनी स्वागतगीत म्हटले. आरंभी येथील तालुका धर्मजागरण प्रमुख काशिनाथ महाराज यांनी सांघिक गीत म्हटले.
कार्यक्रमात मंडल कार्यवाह, उपखंड कार्यवाह, खंड संघचालक दत्तात्रय बनगिनवार, कैलास शेंबाडे व आरंभी मंडळातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते. भारत माता आरतीने संमेलनाची सांगता झाली.