गुढीपाडव्याला आनंदी जोशी अन् चैतन्य कुळकर्णी

16 Mar 2026 21:59:05
वर्धा,
anandi-joshi-chaitanya-kulkarni : श्रीराम मंदिर देवस्थान गोलबाजार व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीरामनवरात्रानिमित्त १८ ते २८ मार्च दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ रोजी सायंकाळी स्कूटर रॅली तर १९ रोजी पहाटे ५.३० वाजता पहाट पाडवा कार्यक्रम होईल. यावर्षी मुंबईची आनंदी जोशी आणि पुण्याच्या चैतन्य कुळकर्णी पडवा पहाट सजवतील, अशी माहिती श्रीराम मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष संजीव लाभे यांनी दिली. स्थानिक श्रीराम मंदिर येथे आज १६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशिकर, देवस्थानचे सचिव विजय धाबे, राजेेंद्र उमाटे, शिरीष जवदंड, संयोजक कमल कुलधरिया, भूषण अग्निहोत्री आदींची उपस्थिती होती.
 
 
kj
 
लाभे पुढे म्हणाले की, देशात शांतता लाभावी, येथील नव्या पिढीवर संस्कार व्हावे यासाठी श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सर्व कार्यक्रमांमध्ये श्रीराम जन्मोत्सव हा कार्यक्रम प्रमुख असतो. या जन्मोत्सवासह स्कूटर रॅली आणि पाडवा पहाट या कार्यक्रमांची माहिती प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी होळीपासुन तब्बल १३ दिवस दररोज श्रीराम प्रभात फेरी काढण्यात येते. मराठी नववर्षाच्या पृष्ठभूमीवर गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला १८ रोजी सायंकाळी ५ वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावरून स्कूट रॅली काढण्यात येईल. १९ रोजी पहाटे ५ वाजता स्थानिक सोशालिस्ट चौकात पाडवा पहाट हा गायणाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम दत्ता मेघे आणि जय महाकाली शिक्षण संस्थेने प्रायोजित केला असल्याचे लाभे यांनी सांगितले.
 
 
 
१९ ते २४ दरम्यान दररोज सकाळी श्रीरामाला पवमान अभिषेक, १९ ते २५ दरम्यान रोजी सायंकाळी ७ वाजता इंदोर येथील हभप श्रुती भंडारे यांची संगीतमय श्रीराम कथा तसेच दररोज २.३० वाजता भजन, सायंकाळी ५ वाजता सामूहिक श्री विष्णूसहस्त्रनाम पठन, ६ वाजता नित्य उपासना होईल. २० रोजी सकाळी ११ वाजतापासुन श्रीरामनाम सामूहिक अखंड जप, २१ रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठन तर सायंकाळी ४ वाजता श्रीविष्णूदास महाराज अध्यात्म साधना केंद्रच्या वतीने उपासना, २३ ते २५ दरम्यान सकाळी ९ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तर २६ रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त १० वाजता प्रभू श्रीरामजन्माचे कीर्तन, सायंकाळी ५.३० वाजता पालखी शोभायात्रा निघेल. यावर्षीच्या शोभायात्रेत श्याम निशान यात्रा विशेष आकर्षण राहणार आल्याचेही त्यांनी सांगितले. २७ रोजी सकाळी १० वाजता गोपाल काल्याचे कीर्तन होईल, असे लाबे यांनी सांगितले.
 
 
श्रीराम मंदिरातील शोभायात्रा वर्धेकरांसाठी एक पर्वणी असते. परंतु, शहरात सुरू असलेल्या बांधकामातील रेती, गिट्टी रस्त्यावर पडून आहेत. तसेच शोभायात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन शोभायात्रेकरिता रस्त्यावरील रेती व गिट्टी उचलण्याची सती ज्याच्याकडे बांधकाम सुरू आहे, त्यांना करावी तसेच रस्त्यावरील खड्डेही बुजवावे, असे अरुण काशिकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनोज पाचखेडे, सतिश कातरकर, संतोष जोशी आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0