यंदा चाहत्यांमध्ये प्रश्न आहे की 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते का? माजी भारतीय खेळाडू इरफान पठाण यांनी देखील असा अंदाज व्यक्त केला आहे की धोनीचा खेळाडू म्हणून हा मोसम शेवटचा ठरू शकतो. चेन्नई संघाने संजू सॅमसनला संघात समाविष्ट केल्यामुळे धोनी मैदानावर कमी वेळ खेळेल आणि मेंटॉरच्या भूमिकेत दिसेल, असे पठाण यांनी सांगितले इरफान पठाणच्या मते, धोनीला सोडून सीएसके संघाची किंवा आयपीएलची कल्पनाही करता येणार नाही. त्याच्या उपस्थितीमुळे संघाला निश्चितच फायदा होईल, तसेच संजू सॅमसनसह युवा खेळाडूंनाही त्याचा लाभ मिळेल.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळत आहे आणि पुढील दोन-तीन वर्षांत सीएसकेच्या भविष्यासाठी खेळाडू तयार करण्याची जबाबदारी धोनीवर आहे. दरम्यान, भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यंदा सीएसकेकडून खेळणार आहे. धोनीसोबत खेळताना आयुषला बरेच काही शिकायला मिळेल. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताने त्याच्या नेतृत्त्वाखाली विजयी होऊन भविष्याच्या क्रिकेटच्या दिशेने महत्वाचा टप्पा गाठला आहे.