ढगाळ वातावरणामुळे तापमान ३७.६ अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा

16 Mar 2026 22:18:13
नागपूर,
heat-wave-warning : मार्चच्या पंधरवाड्यात उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सोमवारी नागपूरचा पारा ३७.६ अंशावर होता. तर रविवारी ३७.४ अंशांवर होता. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांतच नागपूर जिल्ह्याचा पारा ४० टप्पा ओलांडणार आहे. विदर्भातील वाशिमचा पारा चाळिशीवर गेला आहे. अमरावती, ब्रम्हपूरी,वर्धेत उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत आहे.
 
j
 
उन्हाचा थेट सामना टाळा
 
 
मुख्यत: वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा सामना करण्यासाठी शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. शहराचा पारा वाढण्यापूर्वीच नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा थेट सामना टाळावा, असा डॉक्टरांनी दिला आहे.
 
शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज करण्यात येत असून नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष संदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. मेडीकल व मेयोमध्ये १० खाटांचे, तर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ५ खाटांचे उष्माघात कक्ष रुग्णसेवेत सुरू होणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.
मार्चच्या मध्यावरच अनेक जिल्ह्याचा पारा ३९ सेल्सिअसच्या पार गेला असल्याने आगामी काही दिवसात तापमान ४२ अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याशिवाय एप्रिल आणि मे महिन्यातील संभाव्य उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहणे गरजेचे झाले आहे.
 
टोपी, रुमाल, दुप्पटा आदींचा उपयोग करा
 
 
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सैल कपडे घालावे, जाताना टोपी, रुमाल, दुप्पटा आदींचा उपयोग केल्यास उष्णतेपासून धोका होणार नाही. थंड पाणी, थंड पेय पदार्थांचे सेवन करावे. उष्माघात होऊ नयेत,यासाठी दुपारच्या उन्हात जाणे टाळावे. लहान मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना उष्माघातापासून अधिक धोका ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनात औषधोपचार करावा.
Powered By Sangraha 9.0