पदाेन्नतीच्या कक्षेतील हवालदार निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

16 Mar 2026 17:03:26
अनिल कांबळे
नागपूर,
constable retirement राज्य पाेलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक पदाेन्नतीसाठी पात्र असलेले शेकडाे पाेलिस हवालदार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत बरेच जण सेवानिवृत्त झाले आहेत तर अनेक जणांवर पदाेन्नतीविनाच निवृत्त हाेण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारासाठी पाेलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

constable retirement 
 
 
राज्यातील पाेलिस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत पाेलिस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यासाठी 2013 मध्ये पात्रता परीक्षा घेण्यात आली हाेती. त्यामधून आतापर्यंत चार ते पाच हजार पाेलिस हवालदारांना पदाेन्नती देऊन पाेलिस उपनिरीक्षक बनविण्यात आले आहे. मात्र, गेल्या 31 डिसेंबरला पाेलिस महासंचालक विभागाने पदाेन्नतीच्या कक्षेत असलेल्या 419 पाेलिस हवालदारांना तातडीने महसूल संवर्ग मागितले हाेते. पाेलिस कर्माचाऱ्यांनीही चाेवीस तासांच्या आत संवर्ग भरुन दिले हाेते. आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच पदाेन्नतीची यादी निघेल, या आशेवर असलेल्या 419 पाेलिस हवालदारांनी पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी लागणारी वर्दी, कॅप, लाल शूज, बेल्ट, केन आणि दाेन स्टार घेऊन ठेवले. केव्हाही पदाेन्नतीची यादी लागेल आणि तातडीने उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळेल, अशा भाबड्या आशेवर असलेल्या हवालदारांवर चक्क सेवानिवृत्त हाेण्याची वेळ आली आहे. मार्च ते एप्रिल या दाेन महिन्यांत अनेक पाेलिस हवालदारांची सेवानिवृत्ती आहे. त्यामुळे अनेकांवर चाेवीस तासांच्या कार्यकाळाचे पाेलिस उपनिरीक्षक हाेऊन पाेलिस विभागातून निराश हाेऊन निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यामुळे अनेक पाेलिस हवालदारांनी आस्थापना विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पाेलिस शिपाई बॅच क्रमांक 1992-93 या वर्षांतील कर्मचारी पीएसआय पदाेन्नतीच्या कक्षेत आहेत. पदाेन्नतीस विलंब हाेत असल्यामुळे अनेकांनी पदाेन्नती नाकारलीसुद्धा आहे. पाेलिस महासंचालक आणि आस्थापना विभागाचे अति. महासंचालकांच्या दुर्लक्षित धाेरणाचा फटका हवालदारांना बसत आहे. पदाेन्नतीचा घास अगदी ताेंडावर आल्यानंतरही वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे ताे हिरावला जात असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

निवृत्तीची बघितल्या जात आहे वाट
राज्यात जवळपास 600 पेक्षा जास्त पाेलिस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत. गुन्ह्यांचा तपास आणि बंदाेबस्ताचा प्रचंड ताण उपलब्ध असलेल्या उपनिरीक्षकांवर आहे.constable retirement तरीही आस्थापना विभागाकडून पदाेन्नतीच्या प्रश्नावर गांभीर्य दाखविल्या जात नाही आहे. त्यामुळे पदाेन्नतीच्या कक्षेत असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमच्या सेवानिवृत्त हाेण्याची वाट बघितल्या जात आहे का, असा सवाल अनेक पाेलिस हवालदार विचारत आहेत.
Powered By Sangraha 9.0