फिनले मिलच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

16 Mar 2026 22:04:18
अचलपूर,
finlay-mill-office-locked : अचलपूर नगर परिषदेच्या मालमत्ताधारकांकडे करापोटी तब्बल २० कोटी रुपयांची चालू व मागील थकबाकी असून नगर परिषद प्रशासनाकडून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम उघडण्यात आली असतांना सोमवारी नगर पालिकेच्या कर विभागाने ७ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी असलेल्या केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असलेल्या फिनले मिलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
 
 
jk
 
अचलपूर नगर परिषद अंतर्गत परतवाडा व अचलपूर शहरात एकूण ३२ हजार ३०० मालमत्ताधारक असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकित आहे. प्रचंड कर थकित असल्याने याचा परिणाम शहरातील विकास कामावर होत आहे. संबंधित विभाग अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. सध्या अचलपूर नगर परिषद हद्दीतील अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरातील मालमत्ताधारकांकडे चालू वर्षाची चार कोटी तर पूर्वीची तब्बल २० कोटी रुपयाची थकबाकी आहे. यापैकी फिनले मिलकडे ७ कोटी ७० लाखाची थकबाकी आहे. यानुसार शहरातील मोठ्या थकबाकीदारावर वसुली संदर्भात कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी आशिष किटुकले, कर निरीक्षक युवराज केंद्रे, निशान मिश्रा, साजीद बेग, शेख नासीर यांच्या पथकाने फिनले मिलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
 
 
अशाच प्रकारची कारवाई शहरातील मोठ्या थकबाकी मालमत्ताधारकांवर करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0