'त्या' मृतांच्या कुटुंबांना २५ लाखांची मदत

16 Mar 2026 10:42:19
भुवनेश्वर,
Fire accident at SCB Hospital भुवनेश्वर येथे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझीयांनी या घटनेची विभागीय तसेच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. उपचार घेत असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभाग आणि रुग्णालयप्रशासनाला त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. गंभीर अवस्थेतील रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 

SCB Hospital 
 
एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातयेथे सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार एका वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला असून पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा बराचसा भाग रात्री उशिरा झोपेत असतानाच ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक रुग्णांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
 
घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्वप्रथम रुग्णालयाच्या स्वतःच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बाहेरील तीन अग्निशमन वाहनेही घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीमुळे आणि दाट धुरामुळे अनेक रुग्ण जखमी झाले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना तात्काळ दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. अत्यंत गंभीर अवस्थेतील काही रुग्णांना रुग्णालयातील नवीन औषध विभागाच्या अतिदक्षता कक्षात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0