समुद्रपूर,
forest-department : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडतात. यामुळे लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक होते. तसेच वन्यजीवांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जंगलात आगीच्या घटना घडू नये, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मार्च महिना सुरू होताच वनविभाग अॅशन मोडवर आला आहे.

आग लावणार्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले असून अशा लोकांवर व आगीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी उपवनसंरक्षक हरविर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे याच्या मार्गदर्शनात समुद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या मंगरूळ सहवन क्षेत्रातील नियतक्षेत्र मंगरूळ, ताडगाव (पूर्व), ताडगाव (पश्चिम), दसोडा, वानरचुवा आणि गिरड सहवन क्षेत्रातील, खुर्सापार, मोहगाव, शिवणफळ, जोगीणगुंफा, घोंसा, रासा, केसलापार या क्षेत्रांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. ड्रोन कॅमेरे सुद्धा तैनात करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी रात्रंदिवस जंगल परिसरात गस्त घालत आहे. जंगलातील वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने पहिल्यांदाच इतकी मोठी तयारी केल्याचे दिसून येत असून आता जंगल परिसराला लागून असलेल्या शेतकर्यांनी सुद्धा शेतात आग लावताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दरवर्षी विकृत मानसिकतेतून जंगलात काही लोक आग लावत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर उपाय म्हणून यंदा वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. सोबतच ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून देखील नजर ठेवली जात आहे. कोणीही शासकीय राखीव वनात प्रवेश करू नये, वनात आग लावू नये, अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच वणवा लावणार्यांची नावे वनविभागास कळवणार्याला सुद्धा योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे समुद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी सांगितले.