पराभवानंतर पीसीबी अध्यक्षांवर माजी खेळाडूंची टीका

16 Mar 2026 11:13:27
इस्लामाबाद,
Former players criticize PCB chairman after defeat बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मीरपूर येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानवर ११ धावांनी मात करत मालिका २–१ अशी आपल्या नावावर केली. या निकालानंतर पाकिस्तानच्या संघावर आणि व्यवस्थापनावर जोरदार टीका होत असून माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पराभवानंतर अकमल यांनी पाकिस्तान क्रिकेटची सध्याची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते संघाची कामगिरी इतकी खालावली आहे की आता नेदरलँड्ससारख्या तुलनेने लहान संघालाही पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकण्याचा आत्मविश्वास येऊ शकतो. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरही थेट टीका करत उपरोधिक विधान केले.
 
 
naqvi pakistan minister
 
 
संघ मैदानावर सामने जिंकू शकत नसेल तर तुम्ही आयसीसीची ट्रॉफी चोरून घरी आणणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, निर्णायक सामन्यात पाकिस्तानकडून सलमान अली आघा यांनी जबरदस्त फलंदाजी करत ९८ चेंडूंमध्ये १०६ धावांची खेळी केली. त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले. मात्र त्यांच्या या दमदार खेळी असूनही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ शेवटच्या चेंडूवर २७९ धावांवर बाद झाला आणि विजय हातातून निसटला.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत पाच गडी गमावून २९० धावा केल्या. तन्झिद हसनने १०७ धावांची उत्कृष्ट खेळी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याला लिटन दासने ४१ धावांची साथ देत संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मदत केली.
 
 
गोलंदाजीमध्ये तस्कीन अहमदने निर्णायक कामगिरी करत चार फलंदाजांना बाद केले आणि पाकिस्तानच्या डावाला मोठा धक्का दिला. मुस्तफिजुर रहमान आणि नाहिद राणा यांनीही महत्त्वाच्या टप्प्यावर बळी घेत बांगलादेशच्या विजयात मोलाची भर घातली.या मालिकेत पाकिस्तानने काही नव्या खेळाडूंना संधी दिली होती, मात्र संघाकडून अपेक्षित कामगिरी दिसून आली नाही. सुरुवातीलाच गडी बाद झाल्यामुळे संघ सतत दबावाखाली राहिला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून आगामी मोठ्या स्पर्धांपूर्वी संघाने आपली कामगिरी सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0