वॉशिंग्टन,
Germany refuses to accompany Trump होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संभाव्य लष्करी कारवाईबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला जर्मनीकडून मोठा धक्का बसला आहे. जर्मनीने या प्रदेशातील कोणत्याही लष्करी मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. बर्लिनमध्ये दिलेल्या एका दूरचित्रवाणी मुलाखतीत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री Jजोहान वॅडेफुल यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत जर्मनी या संघर्षात सक्रिय लष्करी भूमिका घेण्याच्या बाजूने नाही. त्यांच्या मते होर्मुझ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांद्वारे सोडवणे अधिक योग्य ठरेल.

वेडफुल यांनी युरोपियन संघाच्या सध्याच्या नौदल मोहिमेचा उल्लेख करत तिच्या परिणामकारकतेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट केले की लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले अभियान अद्याप अपेक्षित परिणाम देऊ शकलेले नाही. त्यामुळे ते अभियान होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत वाढवण्याबाबतही जर्मनी साशंक असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी युरोप नेहमीच सहकार्य करण्यास तयार असतो, मात्र सध्या या भागात जर्मनीने थेट लष्करी सहभाग घ्यावा अशी कोणतीही तातडीची गरज दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाल समुद्रात येमेनमधील हुथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये युरोपियन संघाने एक नौदल अभियान सुरू केले होते. हे अभियान पूर्णपणे संरक्षणात्मक स्वरूपाचे असून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत चालवले जात आहे. तरीही या मोहिमेची परिणामकारकता मर्यादित असल्याचे मत जर्मनीने व्यक्त केले आहे.मध्यपूर्वेत सध्या तणाव वाढत असताना जर्मनीची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक विस्कळीत झाली असून जगातील तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवायांद्वारे इराणच्या लष्करी क्षमतांवर, विशेषतः अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर दबाव वाढवला आहे. मात्र जर्मनीने अशा थेट लष्करी कारवायांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या काही देशांना एकत्र येऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवण्यासाठी युती उभारण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते या प्रदेशातील देशांनी स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी असेही सांगितले की हा महत्त्वाचा समुद्री मार्ग अमेरिकेसाठी पूर्वीसारखा अत्यावश्यक राहिलेला नाही, कारण अमेरिकेकडे स्वतःचे मोठे ऊर्जा स्रोत उपलब्ध आहेत.